Rohit Pawar : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर शंका उपस्थित करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे आमदार रोहित पवार यांच्यावर आता पक्षातीलच आमदारांनी जोरदार पलटवार केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) सातत्याने अपघाताची सखोल चौकशी, VSR कंपनी आणि DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी त्यांनी बारामती पोलीस ठाण्यात ठिय्या दिला, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, पक्षातील आमदार अनिल पाटील आणि सुनिल शेळके यांनी रोहित पवारांच्या भूमिकेला “नाटक” आणि “पक्षाचा कब्जा मिळवण्याचा प्रयत्न” म्हणून टीका केली आहे. अनिल पाटील यांचा गंभीर आरोप (Rohit Pawar) राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी रोहित पवारांवर थेट आरोप केला की, “रोहित पवारांना पक्षाचा ताबा हवाय. त्यासाठीच ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत.” ते पुढे म्हणाले, “अजित दादांवर जर तुमचं खरं प्रेम असेल तर नाटक करायची गरज नाही. रोहित पवार काही एजन्सी नाहीत. त्यांच्याकडे पुरावे असतील तर तपास यंत्रणांकडे द्यावेत. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल एवढंच वाटत असेल तर जेव्हा त्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या तेव्हा सोडून जायला नको होतं. सुनेत्राताई लवकरच पत्रकारांना भेटतील आणि स्पष्ट करतील.” अनिल पाटील यांनी सांगितले की, “अमोल मिटकरी असो वा आम्ही सर्व आमदार, आमचं एकच म्हणणं आहे. सगळ्या घटनेचा तपास व्हावा, सत्य बाहेर यावं. यंत्रणा ते काम करतील. राज ठाकरे किंवा रोहित पवार काहीही बोलू द्या, यंत्रणा योग्य तपास करतील.” सुनिल शेळकेंचा पलटवार (Rohit Pawar) राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनी रोहित पवारांच्या आरोपांना “तथ्यहीन” म्हटले. ते म्हणाले, “रोहित पवार दररोज नवे पुरावे आणत आहेत, मग ते वरिष्ठ नेते शरद पवार, सुनेत्राताई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर का मांडत नाहीत? दादांच्या बाबतीत कुणीही राजकारण करत नाही. आपल्या पक्षात काय चाललंय याकडे पाहण्यापेक्षा रोहित पवारांनी स्वतःच्या पक्षात काय चाललंय ते पाहावं. सुनेत्राताईंना राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून योग्य मानसन्मान दिला आहे. झिरवळ प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं आहे, रोहित पवारांच्या आरोपात तथ्य नाही.” रोहित पवारांची भूमिका काय? रोहित पवार गेल्या महिनाभरात अपघातावर सातत्याने शंका व्यक्त करत आहेत. त्यांनी “मोठ्या व्यक्तीचा हात” असल्याचा दावा केला, VSR Ventures कंपनी आणि DGCA विरोधात FIR ची मागणी केली. ते राज ठाकरे, फडणवीस यांची भेट घेत आहेत आणि लवकरच नवे पुरावे जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. अपघातात अजित पवारांसह इतर चार जणांचा मृत्यू झाला होता. AAIB चा प्राथमिक अहवाल अपेक्षित असून, रोहित पवारांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.