रोहित-धवन सलामीलाच योग्य – शरणदीप सिंग

नवी दिल्ली – भारतात येत्या सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या सलामीची जबाबदारी हिटमॅन रोहित शर्मा व शिखर धवन यांच्यावर टाकली गेली पाहिजे. तेच संघाला सातत्याने आक्रमक व मोठी सुरुवात करून देतील, असे मत निवड समितीचे माजी अध्यक्ष शरणदीप सिंग यांनी व्यक्त केले.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, इशान किशन व मयंक आग्रवाल असे अनेक पर्याय सलामीवीर फलंदाज म्हणून आहेत. मात्र, तरीही रोहितसह धवननेच डावाची सुरुवात करणे येग्य राहील. एकतर त्यांच्याकडे या अन्य खेळाडूंपेक्षाही जास्त अनुभव आहे. त्याचा लाभ या स्पर्धेत भारतीय संघाला सातत्याने हईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पाचही सामन्यांत भारताने चार सलामीवीरांच्या जोड्या खेळवल्या. त्यापैकी पाचव्या लढतीत रोहित-विराट कोहली यांनी दमदार कामगिरी केली. तरीही या स्पर्धेत रोहित-धवन जोडीनेच सलामी करावी, असे मत शरणदीप यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून मर्यादित षटकांच्या प्रकारांत रोहित-धवन यांच्या सलामी जोडीने भारताला अनेक लढती जिंकून दिल्या आहेत. रोहितला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागते, परंतु धवनला टी-20 मालिकेतील फक्त एका सामन्यातील अपयशानंतर संघातून डच्चू देण्यात आला. मला या निर्णयाचे आश्चर्य वाटले, असेही त्यांनी सांगितले.
रोहित ज्या सहजतेने फलंदाजी करतो, तसे धवनला अनेकदा शक्य होत नाही. आयसीसीच्या स्पर्धांमधील रोहितची कामगिरी कौतुकास्पद आहे. विश्वचषकामध्ये तुमची सर्वोत्तम जोडीच सलामीला उतरणे गरजेचे आहे. म्हणून रोहित-धवननेच सलामीला यावे. ते दोघेही एकत्रित फलंदाजी करताना खेळण्याचा अधिक आनंद लुटतात आणि त्यामुळे भारतीय संघाला फायदाच होइल, असेही शरणदीप यांनी सांगितले.
यादव-चहलला एकत्र खेळवा
धवनची पाठराखण करताना शरणदीप यांनी फिरकी गोलंदाज द्वयी कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनाही पुन्हा एकदा एकत्रित खेळवण्याची मागणी केली आहे. या देन्ही गोलंदाजांनी आपल्या कारकिर्दीला एकत्रच सुरुवात केली. ज्या ज्या सामन्यात हे दोघेही एकत्र खेळले, त्यावेळी त्यांची कामगिरी सातत्याने सरस झाली आहे. गेल्या काही मालिकांमध्ये या दोघांना एकत्र खेळवण्यात आले नाही. मात्र, टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत त्यांना एकत्र खेळवले गेले तर भारतीय संघासाठी ते खूप यश ठरेल, असेही शरणदीप म्हणाले.





