Donald Trump Nobel Peace Prize । अमेरिकेने पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी याविषयी माहिती दिली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जगातील अनेक देशांमध्ये शांतता करार आणि युद्धबंदीमध्ये मध्यस्थी केली आहे. त्यामुळे त्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, हे शांतता करार महिन्यातून सरासरी एकदा झाले आहेत. ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि नंतर इस्रायलने ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर आता व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी , “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी थायलंड आणि कंबोडिया, इस्रायल आणि इराण, रवांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपवला आहे… राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात दरमहा सरासरी एक शांतता करार किंवा युद्धबंदी केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची वेळ आली आहे.” असे त्यांनी म्हटले. पुढे बोलताना लेविट यांनी, “थायलंड आणि कंबोडिया युद्धात अडकले होते त्यामुळे ३,००,००० हून अधिक लोक विस्थापित झाले होते आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतरच हे थांबवता आले.” त्यासोबतच “ट्रम्प यांनी थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान आणि कंबोडियाच्या पंतप्रधानांशी थेट फोनवर बोलले आणि दोन्ही नेत्यांना सांगितले की जोपर्यंत ते युद्ध संपवत नाहीत तोपर्यंत अमेरिकेसोबत व्यापारावर कोणतीही चर्चा किंवा करार होणार नाही.”असे त्यांनी यावेळी म्हटले. ट्रम्प यांनी स्वतःसाठी नोबेल मागितले होते Donald Trump Nobel Peace Prize । गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी स्वतःसाठी नोबेल पारितोषिक मागितले होते. ट्रम्प म्हणाले होते की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध संपवण्यासह अनेक देशांमधील संघर्ष सोडवले आहेत आणि त्यांच्या राजनैतिक प्रयत्नांसाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात यावे. त्यांनी म्हटले होते की भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष संपवणे हे सर्वात मोठे काम आहे. ट्रम्पच्या युद्धबंदीच्या विधानावरून वाद Donald Trump Nobel Peace Prize । गेल्या काही महिन्यांत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांवरून भारतात बरेच वाद निर्माण झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर झालेल्या युद्धबंदीचे श्रेय ट्रम्प यांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प म्हणाले होते की अमेरिकेने व्यापार थांबवण्याची धमकी दिली होती आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान युद्धातून माघार घेतात. ट्रम्पच्या मते, त्यांनी म्हटले होते की जर भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी लढले तर अमेरिका कोणत्याही प्रकारचा व्यापार करार करणार नाही. ट्रम्पच्या या विधानांना काँग्रेसने वारंवार मुद्दा बनवले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही यावर बराच गदारोळ झाला आहे.