Rohini Paradhye Case : रिलस्टार रोहिणीच्या आठवणीत पती निलेशची भावुक पोस्ट; म्हणाला…
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी रोहिणी (Rohini Paradhye Case) यांनी स्वतःच्याच हॉटेलमधील एका खोलीत टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.

Rohini Paradhye Case : सोशल मीडियावरील प्रसिद्ध रिलस्टार रोहिणी पाराध्ये यांच्या आत्महत्येने मंगळवेढा परिसरात खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी रोहिणी (Rohini Paradhye Case) यांनी स्वतःच्याच हॉटेलमधील एका खोलीत टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.
रोहिणी यांच्या निधनानंतर त्यांचा पती निलेश पाराध्ये याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली असून, त्याची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
पती निलेशची फेसबुकवरील भावुक पोस्ट
रोहिणीच्या (Rohini Paradhye Case) आठवणीत पती निलेशने फेसबुकवर काही फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. “मिस यू ग माझ्या चिमणे…” अशी साद घालत निलेशने लिहिले “माझी बायको, माझ्या चिमणे… मला सोडून जायचं नव्हतं ग. या पाच वर्षांच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणतीच नाही. जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं.”
पुढे तिची आठवण काढताना तो म्हणाला, “आज चांगले दिवस यायला लागले होते… आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता… पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस. आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम… सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं. चिमणे… परत ये गं… तुला खूप काही सांगायचं बाकी आहे… तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय. तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील.”
प्रेमविवाह ते हॉटेल व्यवसाय: असा होता प्रवास
रोहिणी (Rohini Paradhye Case) आणि निलेश यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही काळ ते पुण्यामध्ये वास्तव्यास होते. पुण्यात असतानाच या दोघांनी सोशल मीडियावर रिल्स बनवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना चांगलीच पसंती मिळाली आणि ते रिलस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. काही काळाने दोघेही आपल्या मूळ गावी परतले आणि त्यांनी एकत्र येत ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावाचा हॉटेल व्यवसाय सुरू केला.
व्यवसायाचा ताण ठरला कारणीभूत?
रोहिणी आणि निलेश यांचा हॉटेल व्यवसाय अत्यंत चांगला चालत होता. व्यवसाय वाढत गेल्याने त्यांनी हॉटेलच्या नवीन शाखा देखील सुरू केल्या. मात्र, शाखा वाढल्यामुळे व्यवसायातील व्यस्तता आणि मानसिक तणाव प्रचंड वाढला होता. याच वाढत्या तणावातून आणि त्यातून निर्माण झालेल्या अंतर्गत वादांमुळे त्रस्त होऊन रोहिणी यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे त्यांच्या चाहत्यांकडून आणि परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






