Reel Star Rohini Paradhye : मोठी बातमी! रिलस्टार रोहिणी पाराध्ये प्रकरणाला धक्कादायक वळण; ‘वाद आणि तणाव….’
Reel Star Rohini Paradhye : वाढता व्यवसाय सांभाळताना आर्थिक व्यवस्थापन, शाखांचं नियोजन आणि कामाचा वाढलेला ताण यामुळे दोघांमध्ये वाद आणि तणाव निर्माण झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Reel Star Rohini Paradhye : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं सोशल मीडियासह संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. इन्स्टाग्राम रिल्समुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आणि ‘हॉटेल ग्रामपंचायत’ या नावानं व्यवसाय उभा करणाऱ्या २५ वर्षीय रोहिणी निलेश पाराध्ये यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागचं नेमकं कारण काय? याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात रोहिणी यांनी पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी मंगळवेढा येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
विवाहानंतर काही काळ पुण्यात वास्तव्य –
रोहिणी आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये यांनी प्रेमविवाह केला होता. आंतरजातीय विवाहानंतर काही काळ ते पुण्यात वास्तव्यास होते. याच काळात त्यांनी सोशल मीडियावर रिल्स बनवण्यास सुरुवात केली. त्यांच्या सहज, विनोदी आणि ग्रामीण ढंगाच्या व्हिडीओंना मोठी पसंती मिळाली. त्यानंतर मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी ‘हॉटेल ग्रामपंचायत’ या नावानं हॉटेल व्यवसाय सुरू केला.
दोन ठिकाणी हॉटेलच्या शाखा –
हॉटेलमधील दैनंदिन घडामोडींवर आधारित रिल्समुळे रोहिणी आणि निलेश यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या वाढत्या प्रसिद्धीसोबत हॉटेल व्यवसायालाही मोठं यश मिळालं. पुढे त्यांनी मंगळवेढा तालुक्यात आणखी दोन ठिकाणी हॉटेलच्या शाखा सुरू केल्या. मात्र, वाढता व्यवसाय सांभाळताना आर्थिक व्यवस्थापन, शाखांचं नियोजन आणि कामाचा वाढलेला ताण यामुळे दोघांमध्ये वाद आणि तणाव निर्माण झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या कौटुंबिक आणि व्यावसायिक तणावातूनच रोहिणी यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रोहिणी यांचा निलेश यांच्यासोबतचा हा दुसरा विवाह असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे आत्महत्येमागे नेमकं कारण काय? पती-पत्नीमधील मतभेद की अन्य काही कारण? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणाचा सखोल तपास सुरू आहे.




