Rohini Khadse : निकालाआधीच मतदानाची आकडेवारी व्हायरल ! रोहिणी खडसे यांचा धक्कादायक आरोप

Rohini Khadse – ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि मुक्ताईनगरच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी धक्कादायक आरोप केला आहे.
मुक्ताईनगरमधील १६ मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करावी, यासाठी रोहिणी खडसे यांनी अर्ज दाखल केला आहे. यासाठी त्यांनी अनामत रक्कमही भरली आहे. मुक्ताईनगरमध्ये अनेक मतदान केंद्रावर संशयास्पद निकाल लागला असल्याचा आरोपही रोहिणी खडसे यांनी केला.
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, मुक्ताईनगरमध्ये निकाल लागण्याआधीच एक यादी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. या यादीत प्रतिस्पर्धी उमेदवाराने अमुकतमुक मते मिळतील, अशी गँरटी व्यक्त केली होती. त्या यादीतील आकडे आणि निकाल लागल्यानंतर विशिष्ट मतदान केंद्रावरील मतदान तंतोतंत कसे जुळले? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पाच-दहा मते इकडे-तिकडे केल्यास त्या यादीतील अंदाजाप्रमाणे अचूक निकाल लागला असल्यामुळे संशय घेण्यास जागा आहे. असा कोणताही ज्योतिषी जन्माला आलेला नाही, जो दोन दिवसांनी लागणाऱ्या निकालाचे आकडे इतक्या अचूक पद्धतीने आधीच सांगू शकेल. हे सर्व संशयास्पद आहे.
मुक्ताईनगर विधानसभेत अशी काही गावे आहेत, जिथे प्रतिस्पर्धी उमेदवाराला मते मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती. तिथेही त्यांना जास्त मते मिळाली आहेत. मागच्या तीस वर्षांपासून काही गावात माझे वडील आणि मी कधीही कमी मतदान घेतलेले नाही.
अशा गावातही आम्हाला कमी मतदान झाले आहे. हे शक्य नाही. कुठली लाट आहे किंवा एखादी योजना लोकप्रिय झाली म्हणून जवळचे मतदार पटकन नाते तोडत नाही. हा लोकांचा कल नसून ईव्हीएमने दिलेला कल आहे, असेही त्यांनी सांगितले.





