Shanghai Masters 2024 : बोपण्णा-डोडिग जोडीची दुसऱ्या फेरीत धडक….

Shanghai Masters 2024 (Rohan Bopanna-Ivan Dodig Pair) :- भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियाचा साथीदार इव्हान डोडिग यांनी शुक्रवारी चीनमधील शांघाय येथे पाब्लो कॅरेनो बुस्टा आणि पेड्रो मार्टिनेझ यांच्यावर सरळ सेटमध्ये विजय मिळवत एटीपी शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
बोपण्णा आणि डोडिग या पाचव्या मानांकित जोडीने 63 मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात 6-4, 6-3 असा विजय मिळवला. अशाप्रकारे या दोघांनी जोडी बनवल्यानंतर पहिलाच सामना जिंकला आहे. बोपण्णा आणि डोडिग यांनी पाच ऐस मारले आणि आठ पैकी तीन ब्रेक पॉइंट्सचे गुणांमध्ये रूपांतर केले. त्यांनी आपल्या सर्व्हिस गेममध्ये ब्रेक पॉइंटच्या चार संधी वाचवल्या आणि सामन्यात फक्त एकदाच सर्व्हिस गमावली.
सुमित नागल आणि रामकुमार रामनाथन हे दोघे पहिल्या फेरीतून बाहेर पडल्याने एकेरीत भारताचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. रामकुमारने पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला होता तर नागलला थेट प्रवेश मिळाला होता.



