बगदाद विमानतळावर रॉकेट हल्ला

बगदाद – बगदाद विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आल्याचा दावा इराकच्या लष्कराने केला आहे. या रॉकेट हल्ल्यात दोन व्यवसायिक विमानांचे नुकसान झाले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे इराकी सैन्याच्या सूत्रांनी म्हटले आहे.
हा हल्ला शुक्रवारी साकाळच्या सुमारास झाला. इराकी विमानतळावर उभ्या असलेल्या इराकी एअरवेजच्या विमानांच्या तळाजवळ ही रॉकेट पडली. ही रॉकेट जवळच्या आबुघरिब भागातून डागण्यात आली होती, असेही इराकी सैन्याने म्हटले आहे.
या विमानतळावर इराकबरोबर अमेरिका आणि अन्य मित्र देशांचीही विमाने असतात. विमानतळावरील नागरी आणि लष्करी भागाच्या दरम्यान ही रॉकेट पडली. या रॉकेटमुळे सध्या वापरातून बाद करण्यात आलेल्या एका विमानाचे नुकसान झाले. मात्र त्यामुळे विमानतळाच्या विमान वाहतुकीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.
अमेरिकेने ड्रोन हल्ल्यातून इराणचा कमांडर कासिम सुलेमानीला ठार केल्याला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे इराकमधील अमेरिकेच्या तळांवर या वर्षाच्या प्रारंभापासूनच अशाप्रकारचे हल्ले केले जाऊ लागले आहेत.





