Rocket Attack : लीबियात संयुक्त राष्ट्र मुख्यालयावर रॉकेट हल्ला

कैरो : लीबियात संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयावर गुरुवारी एक रॉकेट हल्ला झाला. संयुक्त राष्ट्राच्या दूतावासाच्यावतीने सुरक्षा परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. लीबियाची राजधानी असलेल्या त्रिपोलीपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या जांझोउर शहरातील मुख्यालायाच्या इमारतीजवळ पडलेल्या या रॉकेटमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या रॉकेट हल्ल्यामुळे इमारतीच्या कुंपणाचेही नुकसान झाले नाही.
लीबियातल्या सरकारच्या गृह मंत्रालयाने मात्र संयुक्त राष्ट्राच्या दूतावासाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न निष्फल केल्याचा दावा केला आहे. हा हल्ला रशियाच्या बनावटीच्या एसपीजी रॉकेटच्या मदतीने करण्यात आला होता. हे रॉकेट कोणी डागले होते, याचा शोध घेतला जातो आहे. सुरक्षा दलांना त्याच प्रकारचे दोन इतर रॉकेट तसेच रॉकेट लाँचर वाहून नेणारे एक वाहन सापडले आहे, असे सरकारने सांगितले.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये लीबियातील स्थितीविषयीचे निवेदन केले जात असताना हा रॉकेट हल्ला झाला. लीबियामध्ये निवडणुका गेण्यास सक्षम असलेले आणि सरकारी यंत्रणा परिणामकारकपणे राबवू शकणाऱ्या एकीकृत सरकारची स्थापना होणे गरजेचे आहे, असे संयुक्त राष्ट्र दूतानी या निवेदनात म्हटले होते. २०११ मध्ये नाटोच्या सैन्याने लीबियातील हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांचा पाडाव केला आणि त्.याच संघर्षात त्यांचा मृत्यू झाला. तेंव्हापासून लीबियामध्ये अराजक स्थिती आहे.





