हौथी बंडखोरांकडून तेलाच्या टँकरवर रॉकट हल्ला

दुबई – येमेनमधील हौथी बंडखोरांकडून लाल समुद्रातील एका तेलाच्या टँकरवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. यामुळे या तेलाच्या टँकरचे मोठे नुकसान झाले आहे. पनामाचा ध्वज असलेल्या या टँकरची मालकी ग्रीकमधील कंपनीकडे आहे.
हौथींनी या हची जबाबदारी लगेच स्वीकारली नसली तरी अमेरिकेने येमेनवर डागलेले एमक्यू-९ रीपर ड्रोन पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे आणि अन्य जहाजांवर हल्ले केले आहेत.
येमेनमधील बंडखोरांनी नव्याने केलेल्या या हल्ल्यांमुळे भूमध्य समुद्र आणि सुएझ कालव्याकडे जाणाऱ्या प्रमुख सागरी मार्गात व्यत्यय आणला आहे. आज हल्ला झालेले विंड हे जहाज रशियातून चीनकडे निघाले होते, असे यूएस लष्कराच्या सेंट्रल कमांडने सांगितले.
चीन आणि रशिया दोघेही लष्करी उपकरणे आणि तेलाच्या खरेदीसाठी इराणशी संबंध ठेवतात. हौथींना इराणचा पाठिंबा आहे. या क्षेपणास्त्रामुळे एमटी विंड या जहाजावर आग लागली.
जहाजावरील कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली. आगीमुळे जहाजावर कोणतीही जीवितहानी झाली नाही. थोड्यावेळाने एमटी विंड हे जहाज पुन्हा आपल्या मार्गावर मार्गस्थ झाले.
इस्रायलने गाझामधील युद्ध संपवावे ही मागणी करत हौथींनी गेल्या काही महिन्यांपासून लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील जहाजांवर हल्ले सुरू केले आहेत.





