हौथी बंडखोरांकडून नेदरलॅन्डच्या जहाजावर रॉकेट हल्ला

दुबई : येमेनमधील हौथी बंडखोरांनी डच ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजावर क्रूझ क्षेपणास्त्राचा हल्ला केल्याचा दावा केला आहे. हे जहाज एडनच्या आखातामध्ये प्रवाहाबरोबर वाहून गेले असल्याचेही हौथींनी म्हटले आहे. आपल्या रॉकेटचा पल्ला आणि इस्रायल-हमासच्या युद्धामुळे जहाजांना लक्ष्य करण्याची कटिबद्धताही सिद्ध करण्यासाठी हौथींनी हा हल्ला केला.
सोमवारी हौथींनी मिनर्व्हाग्राक्ट या जहाजावर केलेला क्रूझ क्षेपणास्त्राचा हल्ला अलिकडच्या महिन्यांमधील सर्वात गंभीर हल्ला मानला जातो आहे. एडनचे आखात लाल समुद्रापासून खूप दूर असून या आखातातील चार बोटी हौथींनी नोव्हेंबर २०२३ पासून अशाच हल्ल्याने बुडवल्या आहेत. इस्रायल – हमासच्या युद्धात युद्धबंदी घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी इस्रायलची व्यापक लष्करी मोहिम अजूनही सुरू आहे.
गाझा सिटीवर लष्करी नियंत्रण मिळवण्यासाठी इस्रायली सैन्याचेहल्ले सुरू आहेत. अणू कार्यक्रमांमुळे इराणवर संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध पुन्हा लागू झाले आहेत. त्यामुळे इस्रायलबरोबर अमेरिकेशी संबंधित तेल कंपन्यांना लक्ष्य करण्यासाठी सर्व उपलब्ध पर्यायांचा अवलंब करण्याची धमकी हौथींनी दिली आहे. हौथींनी डागलेले क्रूझ क्षेपणास्त्र मिनर्व्हाग्राक्टला धडकले, असे हौथी लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी सांगितले.
जहाजाने व्याप्त पॅलेस्टाईनच्या बंदरांमध्ये प्रवेशबंदीचे उल्लंघन केल्याचा त्यांनी आरोप केला. या हल्ल्यात मिनर्व्हाग्राक्टवरील दोन नाविक जखमी झाले, या जहाजावर १९ सदस्यीय कर्मचारी असून त्याध्ये फिलीपिन्स, रशिया, श्रीलंका आणि युक्रेनचे लोक होते. हल्ल्यात मोठे नुकसान झाल्यानंतर त्यांना जहाज रिकामे करावे लागले.





