‘ही देशासाठी चांगली गोष्ट, मात्र…’, मेहुल चोक्सीच्या अटकेवर रॉबर्ट वाड्रांनी दिली प्रतिक्रिया

Robert Vadra on Fugitive Mehul Choksi Arrest | पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळ्यात फरार असलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. सीबीआय आणि ईडीच्या विनंतीवरून ही अटक करण्यात आली असून, मुंबईतील न्यायालयाने याआधीच चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
या अटकेवर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, “ही देशासाठी चांगली गोष्ट आहे. मात्र, अटक पुरेशी नाही. देशाच्या नागरिकांचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई करणे सरकारचे कर्तव्य आहे.”
वड्रा म्हणाले की, “फक्त चोक्सीच नाही, तर नीरव मोदी आणि इतर आरोपींनाही भारतात परत आणले पाहिजे. सरकारने अशा देशांवर दबाव आणावा जिथे हे लोक लपले आहेत, आणि त्यांना प्रत्यार्पित करावे. देशातील ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची भरपाई केली जावी. फक्त आरोपींना अटक करून थांबू नये, तर जे नुकसान झाले त्याची भरपाई देखील महत्त्वाची आहे., अशी मागणी देखील त्यांनी केली.
यावेळी बोलताना वाड्रा यांनी राजकारणात येण्याविषयी देखील भाष्य केले. मी गांधी कुटुंबाचा सदस्य असल्यामुळे मला राजकारणात ओढले जाते. निवडणुकीच्या काळातच माझं नाव आठवलं जातं. प्रियांका गांधी खूप मेहनत करत आहेत. जर काँग्रेसने मला राजकारणात यायला सांगितले, तर मी विचार न करता तयारी दाखवीन., असे ते म्हणाले.
दरम्यान, चोक्सीने बेल्जियममध्ये वास्तव्यासाठी अर्ज करताना बनावट कागदपत्रांचा वापर केला होता आणि भारताकडून प्रत्यार्पण टाळण्याचा प्रयत्न केला होता. विशेष बाब म्हणजे, त्याने अद्याप भारताचे नागरिकत्व सोडलेले नाही. त्यामुळे आता त्याला भारतात आणले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





