Jodhpur Land Case : …अन् रॉबर्ट वाड्रा भडकले पत्रकारावर

जयपूर :- कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या मातोश्री मौरिन वाड्रा यांना राजस्थानातील एका जमीन खरेदी विक्री प्रकरणात तेथील उच्च न्यायालयाने झटका दिला. दरम्यान, याबाबत वाड्रा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पत्रकारावर वाड्रा भडकल्यामुळे वेगळीच स्थितीही निर्माण झाली. मात्र वाड्रा यांच्या निकटवर्तीयांनी त्यांची बाजू सावरून घेतली.
संबंधित पत्रकाराने वाड्रा यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे छायाचित्रही काढले. त्यावर ते भडकले. यांच्यावर पोलीस केस करा असे ओरडत त्यांनी पत्रकाराचा माइक जोराने झटकला. मात्र वाड्रा यांनी न्यूज एजन्सीचा माइक पाहिला नव्हता. त्यांना वाटले कोणी खासगी व्यक्ती त्यांना विचारतो आणि फोटो काढतो आहे त्यामुळे हे घडले असे निकटवर्तीयांनी सांगितले.
दरम्यान, बिकानेरच्या कोलायत येथील जमीन खरेदी विक्री आणि मनी लॉंडरिंग प्रकरणी वाड्रा यांची याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने आज फेटाळली. मात्र या प्रकरणात न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अगोदरच दिला आहे. 275 बिघा जमीनीच्या खरेदीचे हे प्रकरण आहे.
वाड्रा यांनी केवळ 72 लाखांत ही जमीन खरेदी केली आणि 615 टक्के नफ्याने ती विकली असा त्यांच्यावर आरोप आहे. 2019 मध्येही ईडीने याबाबत रॉबर्ट आणि मौरिन यांची चौकशी केली होती.





