Robert Vadra : ईडीची मोठी कारवाई! रॉबर्ट वढेरांशी संबंधित 37 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या विरोधात ईडीने गुरूवारी आरोपपत्र दाखल केले. तसेच, वढेरा आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची 37 कोटी रूपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली. हरियाणातील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती कारवाई करण्यात आली. जमीन व्यवहारात अनियमितता घडल्याचा आरोप ईडीने केला आहे.
वढेरा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रा.लि.कंपनीने वर्ष २००८ मध्ये हरियाणाच्या शिकोहपूरमध्ये ३.५३ एकर जमीन खरेदी केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे ७.५ कोटी रूपयांत तो व्यवहार झाला. त्यावेळी हरियाणात कॉंग्रेसचे सरकार होते. वढेरा यांनी व्यक्तिगत प्रभाव वापरून जमिनीसाठी कमर्शियल परवाना मिळवला. नंतर ४ वर्षांनी म्हणजे सप्टेंबर २०१२ मध्ये स्कायलाईटने ती जमीन डीएलएफ कंपनीला ५८ कोटी रूपयांना विकली. संबंधित प्रकरणी कमी किमतीत जमीन खरेदी करून मोठ्या प्रमाणात नफा कमवण्यात आला. त्यासाठी मनी लॉण्डरिंग करण्यात आले, असा ईडीचा दावा आहे.
आता ईडीने वढेरा, इतर काही व्यक्ती आणि कंपन्या मिळून ११ आरोपींविरोधात दिल्लीतील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. तसेच, ४३ स्थावर मालमत्ता जप्त केल्या. संबंधित प्रकरणी ईडीने एप्रिलमध्ये सलग ३ दिवस वढेरा यांची चौकशी केली होती. इतर २ प्रकरणांतही ईडीकडून त्यांची चौकशी केली जात आहे. ती प्रकरणे राजस्थानमधील जमीन व्यवहार आणि शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारी याने ब्रिटनमध्ये घर खरेदी केल्याशी संबंधित आहेत. वढेरा यांनी सातत्याने गैरकृत्यांचे आरोप फेटाळले आहेत. राजकीय सुडापोटी आपल्याविरोधात पाऊले उचलली जात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.





