संदीप सातव यांची माहिती : दुरुस्तीला बांधकाम विभागाचा हिरवा कंदील
वाघोली – सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करून वाघोली केसनंद या राज्य मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. वाघोली येथील पेट्रोल पंपासमोरील रस्ता सिमेंट कॉंक्रिट करून उर्वरित रस्ता डांबरीकरण करून दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती माजी उपसरपंच संदीप सातव यांनी दिली आहे.
वाघोली येथील वाघोली- केसनंद व वाघोली- आव्हाळवाडी या दोन्ही रस्त्यांबाबत तातडीने दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी संदीप सातव, व ग्रामस्थांकडून वारंवार केली जात होती. सततच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली आहे. त्यानुसार बांधकाम विभागाकडून कामाला सुरुवात झाली आहे.
सातव म्हणाले की, वाघोलीमधील राज्यमार्गांच्या दुरुस्ती व तातडीने निधी उपलब्धतेसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पाठपुरावा आहे. बांधकाम विभागाकडून योग्य ते सहकार्य होत आहे. तातडीने कामे पूर्ण होऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात येत आहेत. याबाबत बांधकाम विभागाकडे निवेदने दिली होती. त्यानुसार वेळोवेळी दुरुस्ती व कामे पूर्णत्वास येत आहे.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने अडचणी सोडण्यात येणार आहेत. वाघोली केसनंद रस्त्यावरील खड्डयांची मालिका संपुष्टात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेळोवेळी खड्डयांची दुरुस्ती, ग्रामस्थांनी तात्पुरती डागडुजी करून रस्ते पूर्ववत केले होते.
बांधकाम विभागाकडे निधीची उपलब्धता होऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे कामाला सुरुवात होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केल्याबद्दल उपसरपंच जयश्री काळे, माजी उपसरपंच संदीप सातव, ग्रामपंचायत सदस्य मालती गोगावले, सामाजिक कार्यकर्ते गणेश गोगावले आदींनी अभिनंदन केले आहे.