Maharashtra Jeevan Pradhikaran : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात संपाचे बिगुल; १३ हजार सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक संकटात, नेमकं काय घडलं?
Maharashtra Jeevan Pradhikaran : औषधे, उपचार आणि बँकेचे हप्ते थकले; जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीचा आक्रमक पवित्रा, ६ मे पासून आंदोलनाचा इशारा.

Maharashtra Jeevan Pradhikaran – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांची हमी शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मार्च २०१७ पासून घेतलेली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून १३ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्त वेतन रखडल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सेवानिवृत्तांचे निवृत्ती वेतन वेळेत मिळत नाही. मार्च, एप्रिल या महिन्यांचे निवृत्ती वेतन अद्याप मिळालेले नाही.
त्यामुळे त्यांचे आर्थिक चक्र थांबले असल्याने औषधे, उपचार, डायलिसिस तसेच बँकेचे हप्ते भरण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. मार्च २०१७ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे अपेक्षित होते. वेतन व भत्यासाठी महोलखापालांकडून तात्पुरता लेखा शिर्ष दिले गेले होते.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाकर्तेपणामुळे ९ वर्षे होऊनही कामे पूर्ण न झाल्याने महालेखापालाने शिर्षास मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने निवृत्तीवेतन होऊ शकलेले नाही. सन २०२६-२७ च्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थ संकल्पात पुरेशी तरतूद असूनही निवृत्तांना निवृत्त वेतन मिळू शकले नाही. तात्पुरत्या स्वरुपात प्राधिकरणाच्या स्वनिधीतून निवृत्तवेतन करावे अशी मागणी केली आहे. परंतु त्याचा विचार ही होत नाही.
या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार अथवा प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावाही केला. मात्र अद्याप प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आता निवृत्त वेतन न झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समिती ६ मे पासून आंदोलन करणार आहे, असा इशारा संघर्ष कृती समितीचे सरचिटणीस संजय केळकर यांनी दिला आहे.





