IPL 2025 Riyan Parag : राजस्थानचा मोठा निर्णय! पहिल्याच सामन्यात रियान पराग विराटच्या खास क्लबमध्ये होणार सामील

IPL 2025 Riyan Parag will replace Sanju Samson as captain of Rajasthan Royals : आयपीएल २०२५ च्या हंगामातील पहिल्या तीन सामन्यांसाठी राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार बदलला आहे. संजू सॅमसन खेळताना दिसेल पण तो पहिल्या तीन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणार नाही. खरंतर, संजू अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाहीये. त्यामुळे त्याच्या जागी युवा खेळाडू रियान पराग कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. त्याच वेळी, पहिल्या सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर, रियान परागच्या नावावर एक विशेष कामगिरी नोंदवली जाईल. यासह, रियान विराटच्या एका खास यादीत सामील होईल.
परागच्या नावावर होणार विशेष कामगिरीची नोंद –
संजू सॅमसन बोटाच्या दुखापतीमुळे पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने, पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान परागकडे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादशी होईल. या सामन्यात रियान टॉस करायला येताच तो आयपीएलच्या इतिहासातील चौथा सर्वात तरुण कर्णधार बनेल. २३ मार्च रोजी सामन्याच्या दिवशी, रियान पराग २३ वर्षे आणि १३३ दिवसांचा असेल. याशिवाय, रियान आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा सर्वात तरुण कर्णधार देखील बनेल.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार –
💪 Update: Sanju will be playing our first three games as a batter, with Riyan stepping up to lead the boys in these matches! 💗 pic.twitter.com/FyHTmBp1F5
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 20, 2025
जर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधाराबद्दल बोलायचे, तर विराट कोहलीचे नाव त्यात प्रथम येते. २०११ मध्ये, डॅनियल व्हिटोरीच्या अनुपस्थितीत विराटला एका सामन्यात आरसीबीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी विराट कोहलीचे वय २२ वर्षे १८७ दिवस होते. या यादीत दुसरे नाव ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथचे आहे. २०२२ मध्ये, स्टीव्ह स्मिथ आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सचे नेतृत्व करताना दिसला होता, त्यावेळी स्मिथ २२ वर्षे आणि ३४४ दिवसांचा होता. तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू सुरेश रैनाचे नाव आहे. ज्याने २०१० मध्ये २३ वर्षे ११२ दिवसांच्या वयात सीएसकेचे नेतृत्व केले होते.
हेही वाचा – BCCI चा IPL 2025 पूर्वी मोठा निर्णय! ‘ही’ बंदी उठवत गोलंदाजांना दिला दिलासा
आयपीएल २०२५ साठी राजस्थान रॉयल्सचा संघ:
रियान पराग (कर्णधार), संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, वानिंदू हसरंगा, महेश तीक्शना, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय सिंग, नितीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, युद्धवीर चरक, फजल फारुकी, वैभव सूर्यवंशी, क्वेना मफाका, कुणाल राठोड आणि अशोक शर्मा.





