BCCI चा IPL 2025 पूर्वी मोठा निर्णय! ‘ही’ बंदी उठवत गोलंदाजांना दिला दिलासा

BCCI lifts saliva on ball ban ahead of IPL 2025 : बीसीसीआयने गुरुवारी बहुसंख्य कर्णधारांच्या संमतीनंतर आयपीएल २०२५ च्या आगामी हंगामात चेंडूवर लाळ वापरण्यावरील बंदी उठवली. मुंबईत झालेल्या कर्णधारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून चेंडू चमकवण्यासाठी लाळ लावण्याच्या जुन्या पद्धतीवर आयसीसीने बंदी घातली होती. २०२२ मध्ये आयसीसीने ही बंदी कायमची केली.
आयपीएल २०२५ पूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय –
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “लाळेवरील बंदी उठवण्यात आली आहे, बहुतेक कर्णधार या निर्णयाच्या बाजूने होते.” कोविड-१९ साथीच्या आजारानंतर आयपीएलने लीगच्या खेळण्याच्या परिस्थितीत आयसीसी निर्बंधांचा समावेश केला होता, परंतु त्याची मार्गदर्शक तत्त्वे खेळाच्या प्रशासकीय मंडळाच्या कक्षेबाहेर आहेत. गुरुवारी घेतलेल्या निर्णयामुळे कोविड-१९ साथीच्या आजारानंतर लाळेचा वापर पुन्हा सुरू होणारी आयपीएल ही पहिली मोठी क्रिकेट स्पर्धा ठरली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले होते की, “कोरोनापूर्वी चेंडूवर लाळ लावणे ही एक सामान्य पद्धत होती. आता कोरोनाचा धोका नसल्याने, आयपीएलमध्ये चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी उठवण्यात काही नुकसान नाही.”
आयपीएल सामन्याच्या दुसऱ्या डावात दोन चेंडू घेता येणार –
त्याचबरोबर दुसरा नियम हा आहे की आयपीएल सामन्यादरम्यान दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाला दोन चेंडू मिळतील. दुसऱ्या डावातील ११ षटकांनंतर म्हणजेच १२ व्या षटकापासून, संघाला एक नवीन चेंडू दिला जाईल. म्हणजे पहिल्या ११ षटकांत एक चेंडू मिळेल आणि दुसरा चेंडू १२ व्या षटकानंतर दिला जाईल. खरंतर, बहुतेक आयपीएल सामने फक्त संध्याकाळीच होतात. पहिल्या डावानंतर दव पडतो. यामुळे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे नुकसान होते. बऱ्याचदा नाणेफेकीवरून कोणता संघ सामना जिंकेल हे ठरवले जाते. हे टाळण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा असा होईल की नाणेफेकीचे महत्त्व कमी होईल आणि नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला फारसा फायदा मिळणार नाही.
चेडूंवर लाळ लावण्यानंतर काय होतो फायदा?
कोविड-१९ महामारीच्या काळात, २०२० मध्ये आयसीसीने आरोग्य आणि सुरक्षेच्या कारणास्तव चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी घातली होती. या निर्णयामुळे गोलंदाजांना चेंडू चमकवण्यासाठी लाळऐवजी घामाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. बीसीसीआयनेही हा नियम देशांतर्गत आणि आयपीएल क्रिकेटमध्ये लागू केला होता. मात्र, महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर, अनेक खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञांनी या बंदीवर पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे होते की, लाळेचा वापर हा क्रिकेटमधील पारंपरिक कौशल्याचा भाग आहे. त्यामुळे गोलंदाजांना स्विंग मिळवण्यास मदत होते.





