PMC Health Report: पुणेकरांनो पाणी उकळून प्या! महापालिकेच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, हजारो नागरिक आजारी
PMC Health Report: आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन; पाणी उकळून पिण्याचा आणि स्वच्छतेचे नियम पाळण्याचा सल्ला.

PMC Health Report – एकीकडे शहरातील पाणी शुद्धीकरण क्षमतेत प्रगती केल्याचा दावा महापालिकेच्या ‘पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल २०२६’ मध्ये करण्यात आला आहे. मात्र, त्याच अहवालातून शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी माहिती समोर आली आहे. सन २०२५ मध्ये शहरात जलजन्य आजारांपैकी तीव्र अतिसाराचे तब्बल ९,५९९ रुग्ण आढळले असून,
इतर सर्व प्रमुख जलजन्य रोगांच्या तुलनेत हा आकडा अनेक पटीने अधिक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि स्वच्छता व्यवस्थेच्या परिणामकारकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेच्या साथ रोग नियंत्रण विभागाकडून एकात्मिक आरोग्य माहिती मंच अंतर्गत जलजन्य, अन्नजन्य आणि श्वसनमार्गे पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर नियमित देखरेख ठेवली जाते.
या नोंदींनुसार २०२५ मध्ये तीव्र अतिसाराचे ९,५९९, विषाणूजन्य कावीळचे १३५, विषमज्वराचे ११०, आमांशचे १७९ आणि कॉलराचा १ रुग्ण आढळला. विशेष म्हणजे, तीव्र अतिसार वगळता विषाणूजन्य कावीळ, विषमज्वर, आमांश आणि कॉलरा या चारही रोगांच्या एकत्रित रुग्णसंख्येच्या जवळपास चारपट रुग्ण केवळ अतिसाराचे नोंदविण्यात आले आहेत.
ही बाब शहरातील जलसुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे मानले जात आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे हे सर्व आजार दूषित पाणी किंवा दूषित अन्नाद्वारे पसरतात. त्यामुळे या रोगांचे प्रमाण हे शहरातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता यंत्रणेची परिणामकारकता दर्शविणारा महत्त्वाचा सार्वजनिक आरोग्य निर्देशक मानला जातो.
हे सुचविले उपाय…
महापालिकेने या आकडेवारीचा जलपुरवठा, सांडपाणी व्यवस्था तसेच अलीकडील जीबीएस उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. रोगप्रसारामागील मूळ कारणांचा शोध घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना उकळून किंवा शुद्ध केलेले पाणी पिणे,
हातांची स्वच्छता राखणे आणि अस्वच्छ ठिकाणचे अन्न टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शहरातील पाणीपुरवठा वाहिन्यांतील गळती, दूषित पाण्याचे मिश्रण आणि सांडपाणी मिसळण्याच्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणण्याची गरज या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.






