PCMC News : महासभेत पर्यावरण गाजणार; सत्ताधाऱ्यांकडून सभा तहकूब करण्याच्या हालचाली
PCMC News : महापालिकेतील नगरसेवकांची प्रशासनावर सडकून टीका

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. १५) महापालिकेत होणार आहे. या सभेमध्ये मोशी दुर्घटनेचे पडसाद उमटणार असून महापालिका प्रशासनावर आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. तसेच प्रशासनासोबत सत्ताधारी पक्षाला देखील जबाबदार धरले जाणार असल्याने सत्ताधारी सभा तहकूब करण्याच्या मानसिकतेत आहेत.
मोशी येथील कचरा डेपोमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर बुधवारी (दि. ८) कचऱ्याचा भलामोठा डोंगर कोसळला. यामध्ये तब्बल २३ कर्मचारी अडकले होते. त्यामधील ५ कर्मचारी घटना घडल्यावर तातडीने बाहेर पडले. तर १८ कर्मचारी आतमध्ये अडकले होते. त्यामधील ९ कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
तर ९ कर्मचाऱ्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले. याला पर्यावऱण विभाग आणि ठेकेदाराने केलेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याने महापालिकेतील नगरसेवकांनी प्रशासनावर सडकून टीका केली आहे. तर आज होणाऱ्या महासभेत या घटनेचे पडसाद उमटणार आहेत.
विरोधकांनी प्रशासनासोबतच सत्ताधारी भाजपच्या काळात झालेला प्रकल्प आणि आमदारांनी केलेला अतिहस्तक्षेप यावरून भाजपला घेरण्याची तयारी केली आहे. तर पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना जबाबदार धरले असून महासभेत त्यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेण्यात येणार आहे.
मात्र, दुसरीकडे या दुर्घटनेने आधीच शहराची बदनामी झाली असल्याने महासभेत आणखी गदारोळ नको या भूमिकेत सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब करण्याचा विचार आहे. तर विरोधकांनी निषेधाची तयारी केली आहे.
Krishna Kumar Goyal: कृष्णकुमार गोयल यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन





