उघड्या गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दापोडी लिंबोरे वस्ती : मनपा प्रशासनाला येईना जाग
पिंपळे गुरव – दापोडीतील लिंबोरे वस्ती येथे गेल्या कित्येक वर्षांपासून गटार उगड्या अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उगड्या गटारामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना डेंग्यू सदृश्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
दापोडीचा परिसर तसे पाहिले तर गजबजलेला असतो. तेथे मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे. दापोडीतील लिंबोरेवस्ती येथे तीन गल्ल्या आहेत. यातील पुढील व मागील गल्ली बंदिस्त गटारे आहेत. पण जी मधली गल्ली आहे ती बंदिस्त गटार केली नाही. या परिसरातील नागरिकांनी अनेक वर्षांपासून तक्रार केल्या. परंतु प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.
महापालिकेचा आरोग्य विभाग शहरात ठिकठिकाणी डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची तपासणी करत आहेत. ज्या ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या आढळतील त्यांना दंड करण्यात आला आहे. परंतु लेंबोरेवस्ती येथील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनदेखील ते याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. प्रशासनाच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दापोडीतील लिंबोरे वस्तीचा हा भाग उगडी गटारे तर कुठे चेंबर तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
या ठिकाणी अनेक कुटुंबे राहत आहेत. लहान मुले खेळत असतात. घरातील मोठी माणसे कामसाठी घराबाहेर असतात. दिवसभर लहान मुले येथे खेळत असतात. उगड्या गटारात मुले पडण्याचा धोका आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आयुष्याशी पालिका प्रशासन खेळत असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत.
आमच्या घराजवळून उगडी गटार गेली आहे. या गटारीत मैलामिश्रित पाणी वाहून येते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंध येत आहे. पाणीपुरवठ्याचा नळ याच ठिकाणी असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा दूषित वातावरणात राहवे लागत असल्याने आमची लहान मुले सतत आजारी पडत आहेत. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही आमची दखल घेतली जात नाही. तेव्हा प्रशासनाने त्वरित हे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.
– कल्पना काची, स्थानिक रहिवासी
आम्ही कामास सुरुवात केली आहे. गटार लाइन टाकण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. काही नागरिकांनी गटार लाइनवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांत एकवाक्यता नाही. संबंधित कामाचे टेंडर पास झाल्यानंतर त्वरित काम सुरू करू.
– चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त





