Diabetes Diet : सणासुदीच्या काळात मधुमेहींनी आहाराची काळजी कशी घ्यावी? १५ महत्त्वाच्या टिप्स
Diabetes Diet : सणासुदीच्या काळात मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उपवास, मिठाई आणि आहाराचे नियोजन कसे करावे? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉ. भार्गवी बडे यांच्या १५ महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

Diabetes Diet : सणासुदीचा काळ म्हटला की आकर्षक मिठाई, फराळ, मेजवान्या आणि विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या काळात आहाराबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उपवास करणे, वेळेवर जेवण न घेणे किंवा एकाच वेळी भरपूर गोड पदार्थ खाणे यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू किंवा कमी होऊ शकते. त्यामुळे सणांचा आनंद घेताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला विघ्नहर्ता साई हॉस्पिटल, पुणे येथील डॉ. भार्गवी विजय बडे यांनी दिला आहे.
उपवास आणि अतिखाणे ठरू शकते धोकादायक –
सणांच्या काळात अनेक जण धार्मिक कारणांमुळे उपवास करतात. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ उपाशी राहू नये. जास्त वेळ उपवास केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच रक्तातील साखर धोकादायक पातळीपर्यंत घसरू शकते. याला हायपोग्लायसेमिया म्हणतात.
दुसरीकडे, उपवास सोडल्यानंतर एकाच वेळी भरपूर खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढू शकते. त्यामुळे उपवास आणि आहार यामध्ये योग्य संतुलन राखणे गरजेचे आहे.
मधुमेहींसाठी सणासुदीच्या आहाराच्या १५ टिप्स –
1. पौष्टिक पदार्थ निवडा : अतिगोड आणि तेलकट पदार्थांऐवजी फळे, सुका मेवा आणि पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या.
2. गोड पदार्थ मर्यादित खा : पारंपरिक मिठाई खायची असल्यास कमी प्रमाणात खा. कृत्रिम गोडवा असलेले पदार्थही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच निवडा.
3. कमी चरबीयुक्त दूध वापरा : खीर किंवा इतर गोड पदार्थ बनवताना स्किम्ड किंवा कमी चरबीयुक्त दुधाचा वापर करा.
4. पेयांची निवड काळजीपूर्वक करा : साखर नसलेली पेये निवडा. फळांच्या रसातही नैसर्गिक साखर असते, त्यामुळे त्याचे सेवन मर्यादित ठेवा.
5. मद्यपान टाळा : मद्यपानामुळे रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो मद्यपान टाळावे. मद्यपान करणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
6. उपवास सोडल्यानंतर अतिखाणे टाळा : उपवासानंतर एकाच वेळी जास्त गोड, तेलकट किंवा कॅलरीयुक्त पदार्थ खाऊ नका.
7. तंतुमय पदार्थ खा : आहारात संपूर्ण धान्ये, कडधान्ये, फळे, भाज्या आणि सॅलडचा समावेश करा. यामुळे पचनास मदत होते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास हातभार लागतो.
8. शारीरिक हालचाल सुरू ठेवा : उपवास नसलेल्या वेळेत चालणे आणि हलका व्यायाम करा. मात्र, अशक्तपणा जाणवत असल्यास अतिश्रम टाळा.
9. शरीराचे संकेत ओळखा : चक्कर येणे, घाम येणे, अशक्तपणा किंवा अस्वस्थ वाटणे याकडे दुर्लक्ष करू नका. गरज पडल्यास उपवास थांबवून वैद्यकीय मदत घ्या.
10. पुरेशी झोप घ्या : रोज पुरेशी विश्रांती आणि झोप घ्या. अपुऱ्या झोपेमुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडू शकते.
11. तणाव कमी ठेवा : सणांच्या धावपळीत तणाव वाढू शकतो. त्यामुळे योग, ध्यान आणि श्वसनाच्या व्यायामासाठी वेळ द्या.
12. नियमित व्यायाम करा : आठवड्यातून किमान पाच दिवस दररोज ३० मिनिटे शारीरिक हालचाल करण्याचा प्रयत्न करा. उपवासानुसार व्यायामाची वेळ ठरवा.
13. रक्तातील साखर तपासा : सणांच्या काळात रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा. त्यामुळे त्यातील चढ-उतार वेळीच लक्षात येतील.
14. औषधे घेणे टाळू नका : सण किंवा उपवासामुळे डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि इन्सुलिन स्वतःहून बंद करू नका. औषधांच्या मात्रेत बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
15. डॉक्टरांच्या संपर्कात राहा : नियमित तपासणी करा. उपवास करायचा असल्यास आधीच डॉक्टरांशी चर्चा करून आहार आणि औषधांचे नियोजन करा.
आरोग्य सांभाळून सणांचा आनंद घ्या –
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी सणांचा आनंद घेण्यासाठी आवडते पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र, पदार्थांचे प्रमाण, खाण्याची वेळ आणि औषधांचे नियोजन याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सणासुदीचा काळ आनंदात आणि आरोग्यदायी पद्धतीने घालवता येऊ शकतो.
– डॉ. भार्गवी विजय बडे, विघ्नहर्ता साई हॉस्पिटल, पुणे





