कबुतरांपासून मानवी आरोग्याला धोका; 60 प्रकारचे आजार होण्याची शक्यता

नागपूर : महानगरांमध्ये कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि जेएसडब्ल्यूने याबाबत जनजागृतीसाठी एक लघुपट तयार केला आहे. फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. संदीप मेस्त्री यांच्या मते, कबुतरांपासून मानवांना ६० वेगवेगळे आजार होऊ शकतात.
यामध्ये क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाज्मोसिस, सिटाकोसिस, राइनायटिस यांसारखे आजार प्रमुख आहेत. त्याचबरोबर त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणे, सायनसायटिस आणि श्वसनमार्गाचे विविध आजार होण्याची शक्यता असते.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी बावस्कर यांनी सांगितले की, कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस आणि क्रायटोकॉकस प्रकारची बुरशी आढळते. कोरडी विष्ठा हवेत मिसळून श्वासाद्वारे शरीरात जाते. यामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार होऊ शकतात. महानगरांमधील उंच इमारती आणि कबुतरखान्यांमध्ये कबुतरांची संख्या सहज उपलब्ध होणाऱ्या अन्नामुळे वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, दयेपोटी कबुतरांना खाऊ घालणे थांबवणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.





