Rishi Sunak : ऋषी सुनक यांना धमकी दिल्या प्रकरणी 21 वर्षीय तरुणाला तुरुंगवास

लंडन : ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांना जीवे मारण्याची धमकी ई-मेल ने दिल्याच्या आरोपाखाली २१ वर्षीय एका युवकाला १४ आठवड्यांचा तुरुंगवास आणि दोन वर्षे प्रतिबंधात्मक आदेशांखाली ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात सुनक ब्रिटनचे पंतप्रधान असताना त्यांना ही धमकीची ई-मेल पाठवण्यात आली होती.
लियाम शॉ असे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीचे नाव असून तो इंग्लंडच्या वायव्येला असलेल्या मर्सीसाइडमधील बिर्केनहेडचा रहिवासी आहे. सुनक यांना अपमानजनक आणि धमकी देणाऱ्या अशा दोन ई-मेल पाठवण्याच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवण्यात आले आहे, असे ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसने सांगितले. वांशिक अपमानाला आजच्या काळात कोठेही, कधीही काहीही स्थान असू शकत नाही, असे सीपीएसमधील वरिष्ठ क्राउन प्रोसिक्युटर मॅथ्यू डिक्सन यांनी सांगितले. लियाम शॉ याने मोबाइवरून या ई-मेल पाठवल्या होत्या.
पोलिसांनी या मोबाइलचा शोध घेऊन त्याला हुडकुन काढले. गेल्या वर्षी ३ सप्टेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र त्याला आपण केलेला गुन्हा आठवत देखील नव्हता. त्यावेळी आपण नशेत असावो, असे त्याचे म्हणणे होते. लिव्हरपूल येथील न्यायालयात हजर केले असता, त्याने आपल्यावरचे दोन्ही आरोप मान्य केले. त्याला १४ आठवड्यांचा तुरुंगवास आणि १२ महिन्यांसाठी कठोर अटी घालून प्रतिबंधक स्थितीत ठेवण्याचे आदेश दिले गेले. या कठोर अटी नंतर रद्द केल्या गेल्या. त्याला २० दिवस पुनर्वसन कामात सहभागी व्हावे लागणार आहे. तसेच ६ महिन्यांसाठी ड्रग्ज पुनर्वसन कार्यक्रमही करावा लागणार आहे.





