Rohit Sharma : ‘क्या रिटायरमेंट ले लूं…?’, रोहित वनडे निवृत्तीबद्दल बोलतानाचा ऋषभ पंतने शेअर केला VIDEO

Rohit Sharma old video goes viral : भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या खास प्रसंगी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतरचा उत्साहाचा क्षण ऋषभ पंतने शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित शर्माने आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट केले की, तो प्रत्येक मोठ्या विजयानंतर निवृत्ती घेणार नाही.
ऋषभ पंतने शेअर केला खास व्हिडीओ –
स्वातंत्र्य दिनानिमित्त ऋषभ पंतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतरचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओत भारतीय संघातील खेळाडू विजयाच्या जल्लोषात दिसत आहेत. यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह इतर खेळाडूंचा उत्साह स्पष्ट दिसतो. व्हिडिओत एका क्षणी पंतने रोहितला विचारले, “तुमच्या हातात स्टंप का आहे?” यावर रोहितने हसत उत्तर दिले, “काय, निवृत्ती घेऊ का? प्रत्येक आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर निवृत्ती थोडीच घेत राहीन!” यासह रोहितने स्पष्ट केले की, एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा त्यांचा कोणताही विचार नाही.
टी-20 विश्वचषक विजयानंतर रोहितने घेतली होती निवृत्ती –
Happy Independence Day, India. 🇮🇳
Some moments stay with you forever and winning for India is at the top of the list. Proud to be Indian.#RP17 📷🕶️ pic.twitter.com/pfgr1tg7da— Rishabh Pant (@RishabhPant17) August 15, 2025
मागील वर्षी 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स येथे झालेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात पराभव करत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याचबरोबर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही या प्रकारातून निवृत्ती घेतली. त्यानंतर भारतीय संघाने नवीन सुरुवात केली असून सूर्यकुमार यादव टी-20 संघाचे नेतृत्व करत आहे.
रोहित शर्मा मैदानावर कधी करणार पुनरागमन?
View this post on Instagram
19 ऑक्टोबर 2025 पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मर्यादित षटकांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाऊन 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. रोहित शर्माचे एकदिवसीय मालिकेत सहभागी होणे जवळपास निश्चित आहे. तो पुन्हा एकदा निळी जर्सी परिधान करत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. भारताचे 19, 23 आणि 25 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामने होणार आहेत.





