IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत भारताला अचानक बदलावा लागला यष्टिरक्षक; ऋषभ पंतने वाढवली चिंता

IND vs ENG Team India’s Wicket Keeper Rishabh Pant Injured : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाला सामन्यादरम्यान आपला यष्टिरक्षक बदलावा लागला आहे. खरं तर, यष्टिरक्षण करताना ऋषभ पंत जखमी झाला आहे, ज्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. पंतच्या जागी ध्रुव जुरेल याने यष्टिरक्षकाची भूमिका निभावण्यासाठी मैदानावर प्रवेश केला आहे. पंतची दुखापत ही भारतीय संघासाठी चांगली बातमी नाही.
सामन्यादरम्यान भारताने यष्टिरक्षक बदलला –
लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाला अचानक आपला यष्टिरक्षक बदलावा लागला. यष्टिरक्षण करताना एक चेंडू ऋषभ पंतच्या बोटाला जोरात लागला, त्यानंतर तो वेदनेत दिसला. पंतची अवस्था पाहून फिजिओला तातडीने मैदानावर यावे लागले. फिजिओने पंतच्या बोटावर स्प्रे मारला. मात्र, यानंतरही पंतच्या वेदना कमी झाल्या नाहीत आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. पंतच्या जागी ध्रुव जुरेल याने यष्टिरक्षक म्हणून मैदानावर प्रवेश केला आहे. पंतच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. या दौऱ्यावर आतापर्यंत पंतने फलंदाजीने अप्रतिम कामगिरी केली आहे. हेडिंग्ले कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये पंतने शतके ठोकली होती, तर एजबॅस्टन येथेही त्याची बॅट चांगलीच तळपली होती.
RISHABH PANT OFF THE FIELD FOR SOME TREATMENT.
– Dhruv Jurel keeping the wickets! pic.twitter.com/aaHiqcF0st
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 10, 2025
नितीश रेड्डीने इंग्लंडला दिले दोन मोठे धक्के –
Dhruv Jurel takes the gloves as Rishabh Pant goes off for treatment on his hand 🔃 pic.twitter.com/LGDgi34IN7
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 10, 2025
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार शुबमन गिलने १४व्या षटकात नितीश कुमार रेड्डीच्या हाती चेंडू सोपवला. गिलचा हा मास्टर स्ट्रोक भारतीय संघासाठी यशस्वी ठरला. नितीशने एकाच षटकात बेन डकेट आणि झॅक क्राउली यांच्या डावाचा अंत केला. डकेट २३ तर क्राउली १८ धावांवर बाद झाला. मात्र, यानंतर जो रूट आणि ऑली पोप यांनी एकत्र येत इंग्लंडचा डाव सावरला.
हेही वाचा – IPL 2025 Ticket Scam : IPL तिकीट घोटाळ्यात CID ची मोठी कारवाई, HCA च्या अध्यक्षासह पाच जणांना अटक
रुट-पोपने सावरला इंग्लंडचा डाव –
बातमी लिहेपर्यंत इंग्लंडने ४२ षटकानंतर २ बाद १२० धावा केल्या आहेत. ऑली पोप (२४) आणि जो रुट (४१) धावांवर खेळत आहेत. विशेष म्हणजे या दोघांनी इंग्लंडचा डाव सावरला असून तिसऱ्या विकेट्साठी ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली आहे. जो रुट उत्कृष्ट लयीत खेळताना दिसत आहे. त्याने आपल्या खेळीत आतापर्यंत ५ चौकार मारले आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे भारतीय संघ विकेट्सच्या शोधात आहे. कारण रेड्डी व्यतिरिक्त कोणत्याच गोलंदाजाला विकेट मिळालेली नाही.





