सातारा – शालेय गणवेश घालून रिपाइंचे साताऱ्यात अनोखे आंदोलन

सातारा – वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करून, समूह शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी रिपाइंच्या आठवले गटाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी खाकी हाफ पॅंट आणि पांढरा शर्ट, असा गणवेश परिधान करून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मारला. जिल्हाधिकाऱ्यांनीच निवेदन स्वीकारावे, असा आग्रह आंदोलकांनी धरल्याने, जितेंद्र डुडी यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे की, आई-वडिलांनंतर दुसरे मातृत्व म्हणजे शिक्षण आहे.
हे शिक्षण दत्तक देण्याच्या अर्थात विकण्याच्या उद्देशाने सरकारने घेतलेला हा निर्णय संविधानविरोधी आहे. सर्वसामान्य वंचित मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे हे षडयंत्र आहे. सरकारी शाळा चालवण्याची पात्रता राज्य सरकारची नसेल, तर या सरकारचा काय उपयो? सरकारने संविधानविरोधी घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा. यावेळी तालुकाध्यक्ष अप्पा तुपे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष बनसोडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





