Rinku Singh Threat : धक्कादायक! रिंकू सिंगला दाऊदच्या डी-कंपनीकडून 10 कोटींची खंडणीची धमकी! नेमकं प्रकरण काय?

Rinku Singh Extortion Threat Case : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंग यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याला दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीच्या नावाने 10 कोटी रुपये खंडणीची मागणी करणारी धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या तपासातून ही माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद दिलशाद नौशाद याला अटक केली असून, त्याच्याकडून चौकशीदरम्यान रिंकू सिंग यांच्याविरोधातील खंडणीच्या धमकीचा खुलासा झाला.
काय आहे प्रकरण
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांना धमकी देण्याच्या प्रकरणात मोहम्मद दिलशाद नौशाद याला अटक करण्यात आली होती. या तपासादरम्यान आरोपीने कबूल केले की, त्याने भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगच्याकडूनही फेब्रुवारी आणि एप्रिल दरम्यान 10 कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती. दिलशादने रिंकू सिंगच्या इव्हेंट मॅनेजरलाही धमकीचा ईमेल पाठवला होता, ज्यामध्ये स्वतःला डी-कंपनीचा सदस्य असल्याचे सांगत खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत बिहारच्या दरभंगा येथील 33 वर्षीय मोहम्मद दिलशाद नौशाद याला त्रिनिदाद आणि टोबॅगो येथून प्रत्यार्पण करून आणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलशादने झिशान सिद्दीकी आणि रिंकू सिंगला धमकी देण्यासाठी डी-कंपनीच्या नावाचा वापर केला आणि तपासाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : हिरोचा झाला झिरो; वैभव सूर्यवंशीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम
झिशान सिद्दीकी यांना धमकी –
एप्रिल 2025 मध्ये जीशान सिद्दीकी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, त्यांना ईमेलद्वारे जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या ईमेलमध्ये असे लिहिले होते की, जर त्यानी पैसे दिले नाहीत, तर त्यांचा अंत त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांच्यासारखा होईल. तपासात असे आढळले की, ही धमकी देणारे ईमेल 19 ते 21 एप्रिल 2025 दरम्यान पाठवण्यात आले होते. या ईमेल्समध्ये डी-कंपनीच्या नावाचा वापर करून तपासाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
पुढील तपास सुरू
मुंबई पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला असून, आरोपीच्या इतर संभाव्य कृत्यांचा शोध घेतला जात आहे. रिंकू सिंगला मिळालेल्या धमकीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतले आहे.





