Ring Road : रिंगरोडमुळे खराब रस्त्यांना ‘डागडुजी’चा दिलासा!
Ring Road : एमएसआरडीसीकडून रस्ते दुरुस्तीचे आश्वासन; जिल्हा परिषदेत बैठकीत निर्णय

हिंजवडी – मुळशी तालुक्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने सुरू असलेल्या रिंगरोडच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची आता तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याची माहिती पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा गटनेते शिवाजी बुचडे यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या दालनात ही बैठक झाली. यावेळी बुचडे यांच्यासह एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता राहुल वसईकर, अभियंता अजित पाटील, शैलजा पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुळशी तालुक्यात मागील काही महिन्यांपासून रिंगरोडचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी पोकलेन, जेसीबी, डंपर यांसह अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने विशेषतः रिहे खोऱ्यातील ग्रामीण व डोंगरी भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोका देखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बुचडे यांनी खराब झालेल्या रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानंतर ही बैठक घेण्यात आली.
मुळशीतील पुढील रस्त्यांची होणार दुरुस्ती
– रिहे–मोरेवाडी रस्ता
– रिहे–ओझरकरवाडी, मोरेवाडी–बोडकेवस्ती रस्ता
– रिहे–खेंगरेवाडी, पडळघरवाडी रस्ता
– पिंपळोली–शेळकेवाडी, पिंपळोली–गवारवाडी रस्ता
– खांबोली–खेंगरेवाडी रस्ता
– उरवडे–मारणेवाडी दत्तनगर रस्ता
– डावजे–धनगरवस्ती रस्ता
– घोटावडे–लांडगेवाडी–बोडकेवाडी रस्ता
“रिंग रोडच्या कामामुळे खराब झालेल्या सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून देण्याची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाने घेतली आहे. पावसाळा संपल्यानंतर आवश्यक रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण तसेच काही शाळांचे बांधकामही करण्यात येणार आहे. रस्त्यांची दुरुस्ती झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.” – शिवाजी बुचडे, गटनेते, जिल्हा परिषद पुणे.
Chatro Ki Gunj: ‘मन की बात’ सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा





