Chatro Ki Gunj: ‘मन की बात’ सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा
Chatro Ki Gunj:

तरुण-तरुणींनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया
Chatro Ki Gunj: आम्हाला स्वतःची मन की बात सांगणारा नाही, तर आमची समस्या ऐकणारा हवा आहे, अशी प्रतिक्रिया छात्रों की गूंजसाठी सीईओपी येथे येणाऱ्या तरुण-तरुणींनी व्यक्त केल्या. यावेळी सर्व जाती-धर्माच्या तरूण-तरूणींचा लोंढा कार्यक्रमस्थळी येताना परिसर छात्रो की गुंजने घुमून गेला. विशेष म्हणजे मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकानींही उपस्थिती लावली.
छात्रो की गुंज कार्यक्रमाला पुणे शहर आणि उपनगरांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून सावित्रीच्या लेकींसह हजारो विद्यार्थी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुण्यात दाखल झाले होते. त्यामुळे पीएमपी, एसटी आणि मेट्रोला या तरूणांची गर्दी दिसून आली.
कार्यक्रमाच्या ठिकाणी झेन-झीं चे ग्रुप उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमस्थळी येत होते. तरुणींनी देशातील वाढती महागाई, महिलांची सुरक्षितता आणि उच्च शिक्षणाच्या सोयी-सुविधांविषयी चिंता व्यक्त केली. देशात स्थिर सरकार असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर विकास कुठेच दिसत नाही, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सामान्य माणूस अडचणीत आहे, अशी खंत पालकांनी व्यक्त केली.
विद्यार्थिनी स्पष्टच बोलल्या…
– आम्ही यापूर्वी कधीही कोणत्याही नेत्याच्या सभेला गेलो नव्हतो.
– राहुल गांधींची भूमिका आणि विचार ऐकण्यासाठी आम्ही आलो.
– देशात सध्या फक्त पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे.
– देशात सत्ता बदल राहुल गांधीच हे करू शकतात.
– आम्ही भाजपचे काम करीत होतो, आता भाजप सोडला.
– देशात भ्रष्टाचार वाढला, सध्याचे नेते वृद्ध झाले आहेत.
– राहुल गांधींची विचारसरणी तरुण नेतृत्वाला वाव देणारी.





