Rihanna: जगप्रसिद्ध गायिका रिहाना बनली तिसऱ्यांदा आई; बाळाचं नाव ठेवलं ‘रॉकी आयरिश मेयर्स’

Rihanna : हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आणि फॅशन आयकॉन रिहाना तिसऱ्यांदा आई झाली आहे. गुरुवारी (२५ सप्टेंबर) तिनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ही आनंदवार्ता चाहत्यांना दिली. या पोस्टसोबत तिनं बाळाला हातात घेतलेला एक फोटोही अपलोड केला आहे. विशेष म्हणजे, रिहानाने आपल्या तिसऱ्या अपत्याचं नावही लगेचच जाहीर केलं आहे. तिनं बाळाचं नाव ‘रॉकी आयरिश मेयर्स’ ठेवल्याचं सांगितलं.
रिहानाच्या मातृत्वाचा प्रवास
रिहानाच्या जोडीदाराच नाव रॉकी आहे. त्यांना याआधी दोन मुलं आहेत. २०२२ मध्ये रिहाना पहिल्यांदा आई झाली. त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये तिनं दुसऱ्या अपत्याला जन्म दिला. आता २०२५ मध्ये तिनं आपल्या तिसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे.
आई झाल्यानंतर रिहाना अनेकदा मातृत्वाच्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलली आहे. तिचं पहिलं बाळ झाल्यावर जवळजवळ एका वर्षभर तिनं त्याचं नाव गुपित ठेवले होते. नंतर तिनं चाहत्यांना त्याचं नाव ‘आरजेडए’ असल्याचं जाहीर केलं.
चाहत्यांचा उत्साह
रिहानाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून जगभरातील तिचे चाहते तिचं अभिनंदन करत आहेत. अनेकांनी तिला शुभेच्छा देत बाळाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
गायिका म्हणून आणि फॅशन व बिझनेस जगतात मोठं नाव कमावलेल्या रिहानाने आता पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.





