विक्रोळीच्या रस्त्यावर रिक्षाचा अपघात…; CM शिंदेंचा मदतीचा हात, महिलेला ताफ्यातील ऍम्ब्युलन्स देऊन केली मदत

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे येथून अधिवेशनासाठी निघाले असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेकडे गेले.
त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, तसेच आपल्या ताफ्यातील रुग्णावाहिका आणि आपला अधिकारी सोबत देऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीबद्दल या महिलेने त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या मदतीचा स्वभाव पुन्हा एकदा सर्वांना अनुभवता आला.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांनी असाच एका अपघातग्रस्त महिलेची मदत केली होती. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या ताफ्यातील गाडी देऊन त्या महिलेस रुग्णालयात दाखल केले होते.
तर महिन्याभरापूर्वी अर्थात 15 जून रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी विक्रोळीनजीक दुचाकीस्वार अपघातग्रस्तांना मदत केली होती. विशेष म्हणजे रात्री दीड वाजता ही घटना घडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे त्या महामार्गावरून जात होते. तेव्हा देखील त्यांनी मदत केली होती.





