IND W vs SA W : ऋचा घोषने दाखवलं रौद्र रूप! एकाच झटक्यात मोडले अनेक विक्रम

Richa Ghosh records in IND W vs SA W : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महिला वनडे विश्वचषक 2025 मधील सामन्यात भारतीय संघाची 22 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋचा घोषने आपल्या रौद्र रूपाने सर्वांचे लक्ष वेधले. ऋचाने या सामन्यात केवळ 77 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 94 धावांची खणखणीत खेळी केली. तिच्या या दमदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने 251 धावांचा टप्पा गाठला. या खेळीदरम्यान ऋचाने आपल्या वनडे कारकिर्दीतील 1000 धावांचा टप्पा गाठला आणि अनेक नवे विक्रम आपल्या नावावर नोंदवले.
क्लोए ट्रायॉनचा मोडला विक्रम –
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या सामन्यात जेव्हा ऋचा फलंदाजीला उतरली, तेव्हा भारतीय संघाची अवस्था 6 बाद 102 धावा अशी होती. येथून ऋचाने एका बाजूने डाव सांभाळत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. स्नेह राणासोबत तिने शेवटच्या 10 षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर आक्रमक हल्ला चढवला. या खेळीमुळे ऋचा महिला वनडे क्रिकेट इतिहासात 8व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तिने दक्षिण आफ्रिकेच्या क्लोए ट्रायॉनच्या 74 धावांच्या विक्रमाला मागे टाकले.
मेग लॅनिंग आणि एलिसा हिलीला टाकले मागे –
When #RichaGhosh bats like that, all you do is stand and applaud.👏
A stunning innings of 94 runs that helped India post a strong total, from a spot of bother
Catch the LIVE action ➡ https://t.co/qUAtuPmsC2#CWC25 👉 #INDvSA | LIVE NOW on Star Sports & JioHotstar! pic.twitter.com/PluY4qxNgs
— Star Sports (@StarSportsIndia) October 9, 2025
ऋचा घोषने महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये 1000 धावा पूर्ण करणारी तिसरी सर्वात वेगवान फलंदाज म्हणून आपले नाव नोंदवले. तिने 1010 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला आणि यासह ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग आणि एलिसा हिली यांना मागे टाकले. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये 1000 धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले गार्डनरच्या नावावर आहे, जिने 917 चेंडूंमध्ये हा पराक्रम केला होता.
भारताची दुसरी यष्टीरक्षक-फलंदाज ठरली –
ऋचा घोष ही भारतीय महिला वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारी दुसरी यष्टीरक्षक-फलंदाज ठरली आहे. तिच्यापूर्वी हा पराक्रम भारताच्या माजी खेळाडू अंजू जैन यांनी केला होता. याशिवाय, ऋचा आणि स्नेह राणा यांच्यातील 8व्या विकेटसाठी झालेली 88 धावांची भागीदारी ही महिला वनडे क्रिकेट इतिहासातील 8व्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठी संयुक्तपणे तिसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.





