पुणे | नदी संवर्धन प्रकल्पाला संजीवनी ; केंद्रीय अंदाजपत्रकात ६९० कोटींचा निधी मंजूर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुळा आणि मुठा नद्यांचे पुनरुज्जीवन आणि त्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुळा- मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ६९० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.
सुमारे १,४७३ कोटींच्या या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ८४१ कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेस दिले जाणार आहे. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत या प्रकल्पासाठी तब्बल ४१६ कोटी रुपयांचे काम केले आहे. केंद्राकडून २५५ कोटींचे अनुदान मिळाले आहे. उर्वरित अनुदानासाठी महापालिकेकडून पाठपुरावा केला जात होता. या प्रकल्पाअंतर्गत महापालिकेकडून शहरात ११ नवीन सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारली आहेत.
प्रकल्पासाठी निधीचे गणित
हा प्रकल्प सुमारे १४७३ कोटींचा असून, प्रकल्प उभारणीसाठी ११७३ कोटींचा खर्च येणार आहे. याशिवाय देखभाल आणि दुरुस्तीसाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात प्रकल्पासाठी केंद्रशासन ८४१ कोटींचे अनुदान महापालिकेस जपानच्या “जायका’ कंपनीच्या माध्यमातून देणार आहे, तर प्रकल्प उभारणीचा उर्वरीत ३३२ कोटींचा खर्च महापालिका करणार आहे.
असा आहे प्रकल्प
या प्रकल्पात ३० टक्के बांधकाम असून, ७० टक्के मशिनरी आहेत. या प्रकल्पास केंद्राने २०१६ मध्ये मान्यता दिली असली, तरी प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम २०२१ मध्ये सुरू झाले होते. मात्र, करोनामुळे हे काम संथगतीने सुरू असल्याने केंद्र शासनाने महापालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर गेल्या दीड वर्षात महापालिकेकडून वेगाने काम सुरू आहे.
यंत्रसामग्री लवकरच पुण्यात
या प्रकल्पातील बांधकामाचा भाग जवळपास पूर्ण होत आला असून, आता त्यात मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री बसविली जाणार आहे. ही सामग्री परदेशातून येणार असून, त्यातील अनेक सामग्री मार्गावर आहे. ती पोहोचताच संबंधित कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. त्यासाठी महापालिकेस निधीची आवश्यकता होती.





