Manchar : आंबेगाव तालुक्यात दुष्काळी उपाययोजनांचा आढावा
Manchar : जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी साठा आणि संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

मंचर : आंबेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा उपलब्धता आणि शेतपिकांच्या नुकसानीसह पीक पंचनाम्यांचा आढावा घेण्यासाठी घोडेगाव येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली. दुष्काळग्रस्तांना आवश्यक मदत वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या 14 ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज यांच्यासह महावितरण, वन विभाग, कृषी विभाग, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. बैठकीत टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि जलस्रोतांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी साठा आणि संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे शासनाच्या निकषांनुसार अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून अहवाल वेळेत सादर करण्यावर भर देण्यात आला. पात्र शेतकर्यांना नियमानुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करावी, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश प्रशासनाने दिले.





