Pimpri : सामाजिक न्याय विभागाचा निधी परत करा-जुगदार

वडगाव मावळ : अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय यांचा सामाजिक न्याय विभागाचा निधी शासनाने इतरत्र वळविला असल्याचा आक्षेप करत तो निधी पुन्हा सामाजिक न्याय विभागात वर्ग करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे मावळ तालुका अध्यक्ष यांनी केली आहे. तहसीलदारांच्या माध्यमातून हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो त्या दिवसाचे औचित्य साधत पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांच्या मार्गदर्शनाने मावळ येथे तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.
ज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मावळ तालुका अध्यक्ष अमित जुगदार यांच्या नेतृत्वात तालुक्यातील पदाधिकारी यांनी आज निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की सामाजिक न्याय विभागाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून इतरत्र वळवण्यात आलेला आहे. हा निधी एससी, एसटी व ओबीसी कॅटेगिरीच्या उत्थानासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी असतो.
एससी कॅटेगिरी चा 441 कोटी व एसटी कॅटेगिरीच्या 337 कोटी व इतर मागासवर्गीयांचा हजारो कोटीचा असा निधी पुन्हा एससी एसटी ओबीसी कॅटेगरी ला रिस्टोर करण्यात यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने तालुका पातळीपासून राज्य पातळीपर्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी मावळ तालुका महासचिव राहुल वंजारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





