पुणे | नानावाड्यातील संग्रहालयास पुणेकरांचा प्रतिसाद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात आलेले आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेडतर्फे व्यवस्थापन केले जाणारे नाना वाडा आणि त्यामधील ऐतिहासिक संग्रहालय सुरू आहे. या प्रेरणादायी वास्तूला पुणेकर साततत्याने उत्स्फूर्तपणे भेट देत आहेत. त्यास पुणेकरांचा मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. अशी माहिती लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेडच्या पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी दिली आहे.
याशिवाय या हेरिटेज वॉक या उपक्रमांतर्गत देखील पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, ते या उपक्रमांतर्गत या वास्तू आणि संग्रहालयाला भेट देण्यासाठी येतात. या संग्रहालयात विविध ११ हून अधिक दालनांमध्ये उमाजी नाईक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद साळवे, चापेकर बंधु, राघोजी साळवे या सारख्या थोर स्वातंत्र्यवीरांच्या वस्तू व संबंधीत नोंदी जतन करण्यात आल्या आहेत.
पुण्याला वैभवशाली इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. इतिहास कालीन अनेक घटना; म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते अनेक थोर क्रांतिकारकांची पुणे ही कर्मभूमी राहिलेली आहे.
इतिहासाच्या या पाऊलखुणा जपताना क्रांतिकारकांचे स्मरण राहवे यासाठी कै. मुक्ताताई टिळक यांच्या संकल्पनेतून पुणे महापालिके तर्फे उभारण्यात आलेल्या नानावाडा स्वातंत्र्यसैनिक संग्राहालयाच्या संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी पुणे महापालिकेने लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीला सोपविली आहे. ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे जाधव म्हणाले.
दरम्यान, हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून लोकमान्य सोसायटीने वेळोवेळी शाळा आणि महाविद्यालयांना देखील या संग्रहालयाचा भेट देण्याचे आवाहन केलेले आहे. पुणेकरांनी या सुटीच्या काळात या वास्तू आणि संग्रहालयास भेट देऊन प्रेरणा घ्यावी असे आवाहन देखील लोकमान्य सोसायटीकडून करण्यात आले आहे.





