पुणे | पुणेकरांचा “मत’संकल्प

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यातील पुणे, शिरुर आणि मावळ या तीनही लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.13) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 61 हजार मतदार असून मतदान केंद्र 2 हजार 25 आहे.
तर शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 25 लाख 39 हजार 702 इतके मतदार असून मतदान केंद्र 2 हजार 509 मतदान केंद्र आहेत. अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर उपस्थित होत्या.
पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदार
विधानसभा – पुरुष – महिला – एकूण
वडगाव शेरी – 2,43,145 – 2,24,421 -4,67,669
शिवाजीनगर – 1,41,388 – 1,37,100 – 2,78,530
कोथरुड – 2,17,328 – 1,97,407 – 4,14,755
पर्वती – 1,74,697 – 1,66,266 – 3,41,055
पुणे कॅन्टोन्मेंट – 1,44,029 -1,38,208 – 2,82,270
कसबा पेठ- 1,37,283 – 1,39,680 -2,76,997
एकूण – 10,57,870 – 10,03,082 – 20,61,276
शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या
विधानसभा मतदारसंघ – पुरुष मतदार – महिला मतदार – एकूण
जुन्नर – 1,59,830 – 1,52,371 – 3,12,205
आंबेगाव – 1,54,535 – 1,47,559 – 3,02,101
खेड – 1,83,057 – 1,69,567 – 3,52,634
शिरुर – 2,29,472 – 2,09,784 – 4,39,276
भोसरी – 3,02,075 – 2,49,416 -5,51,582
हडपसर – 3,07,851 – 2,73,982 – 5,81,904
एकूण – 13,36,820 -12,02,679 -25,39,702
मतदान केंद्रावर असणार या सुविधा
– मतदान केंद्रात उपलब्ध सुविधांबाबत माहिती दर्शविणारे चिन्हे (साईनेज)
– महिला मतदारांसह आलेल्या बालकांसाठी पाळणाघरची सुविधा
– मतदारांना आपले मतदान केंद्र क्रमांक, मतदार यादी भाग मधील अनुक्रमांक शोधण्यासाठी मदत करण्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले मदतकक्ष
– मतदान केंद्रावर महिला, पुरुष आणि ज्येष्ठ, तसेच दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र रांगा
– जर मतदानासाठी रांगा असेल तर मतदारांना बसण्यासाठी प्रतिक्षा कक्ष
– उन्हाळा लक्षात घेता पिण्याचे पाणी आणि सावलीसाठी मंडपाची व्यवस्था
– रांगांचे व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक, मदतनीस
– ज्येष्ठ, दिव्यांग, हालचाल करण्यास अक्षम (लोकोमोटिव डिसेबल्स) आदींसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर
२०० रुग्णालयांशी करार
निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विषयक समस्या तातडीने सोडविता याव्यात, यासाठी शहरासह ग्रामीण भागातील २०० रुग्णालयांशी कॅशलेस उपचारांसाठी करार केला आहे. याद्वारे तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
प्रथमोपचार पेट्या, औषधांची व्यवस्था
अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी २ हजार ६९१ प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी १० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण कृषी महाविद्यालय येथील वितरण केंद्रातून करण्यात आले. प्रथमोपचार पेटीमध्ये बँडेज, कापूस,बीटाडाईन ट्यूब, अँटीसेफ्टीक सोल्युशन, हातमोजे, पॅरासिटामॉल, रँनटीडीन टॅबलेट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास बंदी
ईव्हीएमवर प्रत्यक्ष मतदान करतानाचे चित्रीकरण मोबाइलद्वारे काही ठिकाणी करण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्र परिसराचे चित्रीकरण तसेच फोटो मोबाइलवर काढण्यात येत आहेत.
त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी घातली आहे. मतदानासाठी जाताना मतदारांनी मोबाइल घेऊन जाऊ नये, तो घरीच अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवाव, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मतदान करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.





