Congress News – राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला अपयशाला सामोरे जावे लागले. यात कॉंग्रेसलाही मोठा पराभवाचा सामना करावा लागला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदापासून मुक्त करण्याची विनंती कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसच्या पिछेहाटीला जबाबदार धरुन नानांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरु लागली होती.
लोकसभेच्या निकालानंतर जोमात आलेली कॉंग्रेस विधानसभा निकालानंतर पुन्हा एकदा कोमात गेली. धक्कादायक निकाल आणि कॉग्रेसमधील दिग्गज नेत्यांचा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला. या निकालानंतर कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलावा, अशी मागणी कॉंग्रेसच्याच अंतर्गत वर्तृळातून जोर धरू लागली. सध्याचे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आता स्वत:हूनच मल्लिकार्जुन खर्गेंना ईमेल करत आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली.
सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजीत कदम, विजय वडेट्टीवार यांची नावं प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. नव्या आणि तरुण चेह-यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षांसोबतच काँग्रेसची सध्याची कार्यकारिणीही बरखास्त केली जाण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेसमध्ये नव्यानं संघटना बांधणी होणारएकंदरीतच विधानसभेत जागावाटपात झालेल्या चुका, फसलेली निवडणूक रणनीती आणि अतिआत्मविश्वास याचाच फटका काँग्रेसला बसला का, यावर बरंच मंथन करून झाले. आता नव्याने निवडणुकांना सामोरे जाताना काँग्रेसला नव्या चेह-यांसह नवी भूमिका घेऊन पुढे जावे लागणार आहे. त्यामुळे आता भविष्यकाळात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.