रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व बँकेचा डॉलर वापर, परकीय चलन साठा 702.57 अब्ज डॉलरवर

मुंबई – रिझर्व बँकेला रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी डॉलरचा वापर करावा लागत असल्याचे समजले जाते. अशा परिस्थितीत 19 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 396 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 702.57 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. मात्र हा परकीय चलन साठा भारताला एक वर्षापेक्षा जास्त काळाच्या आयातीसाठी पुरेसा असल्याचे समजले जाते.
या अगोदरच्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 4.6 अब्ज डॉलरने वाढून 702.96 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीपर्यंत गेला होता. मात्र दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेने एच= 1 बी व्हिसावरील शुल्क 5,000 डॉलरवरून 1 लाख रुपये केले. अशा परिस्थितीत याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. या कारणामुळे डॉलरची मागणी वाढून रुपयाचे मूल्य कमी झाले आहे. अशा परिस्थितीत मूल्य स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व बँकेला डॉलरचा वापर करावा लागत असल्याचे समजले जाते.
विशेष म्हणजे या आठवड्यामध्ये जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर गेल्या आहेत. त्यामुळे भारताकडे असलेल्या सोन्याचे मूल्य या कालावधीत 360 दशलक्ष डॉलरने वाढून 92.77 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेले आहे.
दरम्यान रुपयाच्या मूल्यावर दबाव कायम आहे. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेने हस्तक्षेप केल्यामुळे शुक्रवारी रुपयाचा भाव 4 पैशांनी वाढून 88.72 रुपये प्रति डॉलर या पातळीवर जाण्यास मदत झाली. रुपयाचे मूल्य घसरत असल्यामुळे त्याचा निर्यातदारांना लाभ होत आहे. मात्र आयात महागात पडत आहे.




