पुसेगाव : ऐन उन्हाळ्यातही खटाव तालुक्याच्या उत्तर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी पुसेगाव ता खटाव येथील येरळा नदीला प्रचंड पूर आला. सातारा – पंढरपूर रस्त्यावरील पुसेगावच्या येरळा नदीच्या पुलाखाली पाण्यात अडकलेल्या एका मनोरुग्ण व्यक्तीला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाहेर काढत पुसेगाव पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले. त्याबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या चार दिवसांपासून पुसेगाव परिसरात एक मनोरुग्ण व्यक्ती आला असून त्याला मराठी भाषाही कळत नाही.काही बोललेलेही समजत नाही.दिवसभर मिळेल ते खाऊन येरळा नदीच्या पुलाखाली एका खडकावर दिवसभर झोपणे असा त्याचा दिनक्रम होता. सकाळ पासून खटाव तालुक्यातील सर्वच भागात प्रचंड पाऊस कोसळत होता. सकाळी ११ वाजल्यापासून बुध डिस्कळ राजापूर वर्धनगड भागातून पाण्याचा प्रचंड प्रवाह येरळा नदीत वाढत होता. मात्र पुलाखाली खडकावर झोपलेल्या त्या मनोरुग्ण व्यक्तीला याची कसलीही जाणीव नव्हती. सकाळपासून कोणीही माणूस कारणास्तव घराबाहेर पडत नसल्याचे सर्वत्र दिसून येत होते. मात्र दुपारी पावणे बाराच्या दरम्यान नदीकडेला असलेल्या वाहनविक्री शोरुम मधून एकाने फोन करून मनोरुग्ण व्यक्ती पुरात अडकली असून पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे ही व्यक्ती वाहून जाण्याची शक्यता वर्तवत पुसेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या सूचनेनुसार तात्काळ गोपनीय हवालदार दर्याबा नरळे, पोलीस हवालदार सुनील अब्दागिरे अविनाश घाडगे घटनास्थळी दाखल झाले. मात्र पाण्याचा सातत्याने वाढणारा प्रचंड ओघ, संबंधित मनोरुग्ण व्यक्तीच्या भाषेचा अडसर, बोललेले काहीही त्याला समजेना, यामुळे त्या व्यक्तीला वाचवणे जिकिरीचे असतानाही पोलिसांनी प्रसंगी पुराच्या पाण्यात स्वतःच्या जीवावर उदार होऊन पाण्याच्या मोठ्या प्रवाहात जात त्या मनोरुग्ण व्यक्तीची पुरात वाहून जाण्यापासून सुटका केली. त्याला येथील श्री सेवागिरी महाराज मंदिरात आणून त्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. याबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.