पुणे | रा. स्व. संघातर्फे विजयादशमी पथसंचलन उत्साहात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन असलेल्या विजयादशमीच्या निमित्ताने शनिवारी (१२ ऑक्टो.) रा.स्व. संघाच्या पुणे महानगर रचनेतील ५८ ठिकाणी सघोष संचलने काढण्यात आली.
पुणे महानगरात नऊ भगातील विविध ५५ नगरांमध्ये काढण्यात आलेल्या संचलनांमध्ये एकूण बारा हजारांहून अधिक पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
महानगरात सर्व उपनगर आणि वस्त्यांमध्ये (झोपडपट्टी) सर्व स्तरातील नागरिकांनी पथसंचलनाचे जोरदार स्वागत केले. यंदा संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने पथ संचलनांना वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. विजयादशमी निमित्ताने विविध नगरांमध्ये सकाळी ७.३० वाजता सघोष संचलनांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथेप्रमाणे सकाळी रा.स्व. संघाच्या वैशिष्ट्यपूर्ण घोषातर्फे शिवाजीनगर भागातील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सघोष मानवंदना देण्यात आली.
यावेळी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर आणि कसबा भागाचे संघचालक अॅड. प्रशांत यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्याआधी वंजारवाडकर आणि यादव यांच्या हस्ते मोतीबाग कार्यालयात शंख आणि भगव्या ध्वजाचे पूजन तसेच ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले उपस्थित होते.
शहरातील विविध वस्त्या आणि छोट्या- मोठ्या सोसायट्यांमधून संचलन मार्गांचे प्रकारचे नियोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातही यंदा प्रथमच सघोष संचलन काढण्यात आले. दरम्यान काही ठिकाणी संचलनासमवेत शस्त्र पूजन उत्सवांचे आयोजनही करण्यात आले होते.





