भागवत, तुम्हीसुद्धा? ‘सामना’च्या अग्रलेखातून टीकेचे बाण; सरसंघचालकांना लक्ष्य, ‘RSS चे ‘हे’ पाप आज देशाच्या…’

Saamana Agralekh : नुकताच दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी पार पडला. या मेळाव्याच्या दिवशी २ अॅाक्टोबर या दिवशी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरमध्ये पथसंचलन पार पडले. या कार्यक्रमातून संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण झालं. या भाषणातून त्यांनी विविध मुद्यावर भाष्य करत नेपाळ येथे उद्धभलेली परिस्थिती आदींवर भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील मुद्यावर शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून मोहन भागवत आणि राष्ट्रीय स्वयंसंघाला लक्ष्य करण्यात आलं आहे.
भाजपचीची ‘री’ ओढली
सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी मेळाव्यात नेहमीप्रमाणे भाषण केले. त्यात मार्गदर्शक, दिशादर्शक वगैरे असे काही नव्हते. संघ स्थापनेला शंभर वर्षे झाली. त्यामुळे विजयादशमीच्या मेळाव्यातून काही वेगळा संदेश मिळेल असे वाटले होते. सरसंघचालकांनी भाजपचीच ‘री’ ओढली, असल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.
हिंदू-मुसलमानांत सतत हिंसा भडकवून….
भागवत यांनी शेजारच्या देशांतील जन आंदोलनाचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. भारताशेजारील श्रीलंका, बांगलादेश आणि अलीकडे नेपाळ येथे जनक्षोभाचा हिंसक उद्रेक होऊन सत्तांतर घडले. आपल्या देशात तसेच जगभरात अशा प्रकारच्या उपद्रवांना उत्तेजन देणाऱ्या शक्ती सक्रिय आहेत. सरकारविरोधातील असंतोषासाठी रस्त्यावर उतरून हिंसा योग्य नसल्याचे भाष्य सरसंघचालकांनी केले. भागवत यांनी केलेले मार्गदर्शन खरे की हिंदू-मुसलमानांत सतत हिंसा भडकवून द्वेषाचा वणवा पेटवणारे ‘भाजप’चे राजकारण खरे? असा सवाल करण्यात आला आहे.
मोहम्मद अली जीनांचे राज्य हवे आहे.
मोदी-शहांचे राज्य ही संघाची स्वप्नपूर्ती आहे. देशातील एकात्मता संपवून येथे सहिष्णू हिंदूंचे नव्हे, तर धर्मांध, बुरसटलेल्या विचारांच्या हिंदूंचे राज्य यावे व अशा राज्याला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून मान्यता मिळावी, अशी संघाची धारणा आहे. थोडक्यात संघाला येथे हिंदू मोहम्मद अली जीनांचे राज्य हवे आहे. भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ करणे हे त्यांचे ध्येय आहे व त्यासाठी देशातील व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, संसद यांचा बळी गेला तरी चालेल, असा घणाघाती आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोठेच नव्हता
संपूर्ण देश अदानीसारख्या लाडक्या उद्योगपतीच्या खिशात घातला. या दरोडेखोरीवर सरसंघचालकांनी प्रखर भाष्य करणे आवश्यक होते. राष्ट्रीय संपत्तीची ही अशी लूट ब्रिटिश काळात वाढली तेव्हा स्वराज्याचे आंदोलन सुरू झाले. लोक बेभान होऊन रस्त्यावर उतरले. गांधींच्या नेतृत्वाखाली लढा झाला व ब्रिटिशांना या देशातून हाकलून दिले गेले. ब्रिटिशांची साम्राज्यशाही नष्ट केल्यावर भारतात लोकांचे राज्य आले. अर्थात, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व नंतरच्या राष्ट्र उभारणीच्या कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोठेच नव्हता, असा दावा अग्रलेखात म्हटलं आहे.
हे संघाचे पाप आज….
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा साधा ओरखडाही संघाच्या वाटचालीवर उठला नाही. तरीही हे लोक स्वातंत्र्य, राष्ट्रवाद वगैरेंवर भाषणे झोडतात याचे आश्चर्य वाटते. संघाला शंभर वर्षे झाली म्हणून त्याच्या नावाने पोस्टाचे तिकीट, खास नाणी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली, पण संघाने निर्माण केलेले भाजपचे नाणे खोटे आणि भ्रष्ट आहे. मोदी-शहांसारखे हुकूमशहा संघाने निर्माण केले व त्यांच्या हुकूमशाहीला बळ दिले हे संघाचे पाप आज बसले आहे, अशी घणाघाती निशाणा साधण्यात आला आहे. या मंडळींचा राष्ट्रवादाचा बुरखा रोज फाटत आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
‘भागवत, तुम्हीसुद्धा?’
जनक्षोभ, जन आंदोलन हे जनतेला स्वातंत्र्य व लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत. राज्यकर्त्यांना ते दडपता येणार नाहीत. लोकशाही मार्गानेच बदल शक्य आहे, पण लोकशाही, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट हुकूमशहाच्या कोठ्यावर मुजरे झाडू लागतात तेव्हा काय करायचे? सरसंघचालकांनी देशाला यावर मार्गदर्शन करणे आवश्यक होते. मोदी-शहांच्या कारभाराचे तुणतुणे वाजवायला डरपोक आणि भाडोत्र्यांची मोठी फौज आहे. भागवतही त्यात सामील झाले. ‘भागवत, तुम्हीसुद्धा?’ हा राष्ट्रभक्त जनतेचा सवाल आहे! असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
हेही वाचा : “पाकिस्तानला जगाच्या नकाशावर राहायचे असेल तर…”; भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचा कठोर इशारा





