Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनाचा अर्थ, परंपरा आणि यंदाचे खास पाहुणे
Republic Day 2026: दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारतभर प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. हा दिवस केवळ राष्ट्रीय सुट्टी नसून, भारतीय संविधान लागू झाल्याचा ऐतिहासिक क्षण आठवण करून देणारा आहे.

Republic Day 2026: दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारतभर प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. हा दिवस केवळ राष्ट्रीय सुट्टी नसून, भारतीय संविधान लागू झाल्याचा ऐतिहासिक क्षण आठवण करून देणारा आहे. १९५० साली याच दिवशी भारत एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून जगासमोर उभा राहिला. म्हणूनच प्रजासत्ताक दिनाला केवळ राजकीय नाही, तर सामाजिक आणि भावनिक महत्त्वही आहे.
दिल्लीमध्ये झेंडा कोण फडकवतो?
दिल्लीतील कर्तव्य पथ येथे होणाऱ्या भव्य प्रजासत्ताक दिन परेडची सुरुवात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवून होते. राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असल्याने, संविधानाचा सन्मान म्हणून हा मान त्यांना दिला जातो. झेंडा फडकवल्यानंतर राष्ट्रगीत आणि २१ तोफांची सलामी दिली जाते. हा क्षण पाहताना संपूर्ण देशभर अभिमानाची लहर पसरते.
तिरंग्याचे महत्त्व काय?
भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणजे केवळ तीन रंगांच कापड नाही, तर भारतीय मूल्यांचा आत्मा आहे.
केशरी रंग – धैर्य, त्याग आणि शौर्य
पांढरा रंग – सत्य, शांतता आणि प्रामाणिकपणा
हिरवा रंग – समृद्धी, विकास आणि निसर्ग
अशोकचक्र – सतत प्रगतीकडे नेणारा न्यायाचा मार्ग
तिरंगा प्रत्येक भारतीयाला समान अधिकार, जबाबदारी आणि एकतेची आठवण करून देतो. म्हणूनच प्रजासत्ताक दिनी झेंड्याला मानवंदना देताना मन नकळत भारावून जातं.

Indian Flag
प्रजासत्ताक दिन परेड…सामर्थ्य आणि संस्कृतीचा संगम
दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेड ही भारताची लष्करी ताकद, सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक एकात्मता जगासमोर मांडणारी भव्य झलक असते.
परेडमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे संचलन, अत्याधुनिक शस्त्रसज्जता, तसेच विविध राज्यांचे चित्ररथ सादर होतात. लोकनृत्य, लोककला आणि सांस्कृतिक सादरीकरणातून “एक भारत, श्रेष्ठ भारत” ही संकल्पना ठळकपणे दिसते.
यावर्षी भारताचे खास पाहुणे कोण?
यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष महत्त्व आहे. युरोपियन युनियनचे दोन सर्वोच्च नेते भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
अँटोनियो कोस्टा – युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष
उर्सुला व्हॉन डेर लेयन – युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा
या उपस्थितीमुळे भारत आणि युरोपियन संघातील धोरणात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होत असल्याचं चित्र दिसतं.

Indian Constitution
प्रजासत्ताक दिन : केवळ सोहळा नाही, तर जाणीव
प्रजासत्ताक दिन हा केवळ परेड, भाषणं किंवा उत्सवापुरता मर्यादित नाही. तो संविधानाची जाणीव, नागरिकांची जबाबदारी आणि लोकशाहीची ताकद आठवण करून देणारा दिवस आहे. तिरंग्याकडे पाहताना देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते हाच या दिवसाचा खरा अर्थ आहे.





