अँटालिया प्रकरणात वाझेंकडून वारंवार हस्तक्षेप; एटीएसच्या रिपोर्टमधून खुलासा

मुंबई – देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बंगल्याबाहेर धमकी पत्रासह जिलिटिनने भरलेली स्कॉर्पियो वाहन आढळले होते. या प्रकरणाने पुढे जाऊन अनेक नवी वळणे घेतली. पण सुरुवातीला ही स्कॉर्पिओ सापडली असताना बॉम्ब शोध आणि निकामी पथकाकडून या वाहनाची तपासणी सुरु असताना सचिन वाझे या तपासात अडथळा निर्माण करत असल्याचे एटीएसच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आम्हाला संबंधित वाहनापबद्दल माहिती समजली आणि आम्ही त्याचा तपास करत होतो, तेव्हा 3 वाजून 50 मिनिटांनी आम्ही तिथे पोहोचलो. ज्यानंतर 9 वाजेपर्यंत आम्ही तपासणी केली. पण आमच्या पोहोचण्याआधीच सचिन वाझे त्याठिकाणी पोहोचले होते. तसेच आमच्या तपासांत वारंवार हस्तक्षेप करत होते.
गाडीचा दरवाजा खोलताच त्यातून एक चिठ्ठी मिळाली. ज्यामध्ये अंबानी कुटुंबियांना धमकावणारा मजकूर लिहिण्यात आला होता. याबद्दल आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवले. तसेच लगेचच नागरिकांना गाडीपासून दूर होण्यास सांगितले. त्यानंतर त्यात जिलिटिनच्या काड्या मिळाले. यानंतर बॉम्ब शोधक पथकातील व्यक्ती तपास करत असतानाही वारंवार वाझे गाडीजवळ जाऊन स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात टाकत होते. त्यामुळे आम्ही त्यांना असे करु नका असे बजावले.
दरम्यान, हा अहवाल एटीएसने चांदीवाल आयोगासमोर ठेवला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवेदनानंतर हा रिपोर्ट समोर ठेवण्यात आला आहे. देशमुख यांच्या रिपोर्टनुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह हेच मागील मास्टरमाइंड आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.





