मुंबई : सचिन वाझे, अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांचे त्रिकुट त्या काळात होते. तसेच सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची बैठक झाली होती एवढंच नाही तर परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचीही बैठक झाली होती. पण मला पुरावे दिले गेले नाहीत. अनिल देशमुख आणि सचिन वाझे हे तेरी भी चूप मेरी भी चूप असे वागत होते, हे वास्तव आहे, असा खुलासा न्या. चांदिवाल यांनी केला आहे. 100 कोटींच्या खंडणीचे टार्गेट आपल्याला मविआच्या काळात गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी दिले होते, असा आरोप माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी मविआ सरकारच्या काळात केला होता. यावरून अनिल देशमुख यांनी तीन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जाणीवपूर्वक प्रकरणात अडकवले, असे म्हटले होते. तसेच चांदिवाल आयोगाचा अहवाल समोर का आणला जात नाही? असाही सवाल केला होता. त्यावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत न्या. चांदिवाल यांनी मोठा खुलासा केला आहे. न्या. चांदिवाल म्हणाले, सचिन वाझे यांची चौकशी सुरु असताना मविआ सरकारच्या काळात पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा उल्लेख केला होता. मात्र, त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ही बाब नमूद केली नव्हती. सचिन वाझेंची चौकशी करताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचा एक What’s App मेसेज दाखवला होता. त्यामध्ये 40 लाख रुपयांचा उल्लेख होता. सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होते. पण ते कधीकधी त्यांच्या वकिलांनाही जुमानायचे नाहीत. सचिन वाझे हुशार आणि चाणाक्ष माणूस होता, असेही त्यांनी म्हटले आहे.