सचिन वाझे होणार माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांच्या अडणीत वाढ

मुंबई – बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत सचिन वाझेंनी विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सीबीआयने त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली असून 30 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेला सर्व तरतुदी तसंच कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. विशेष सीबीआय कोर्टाने सचिन वाझेचा अर्ज स्वीकारला तर त्यांचा जबाब फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवला जाईल. तसेच इतर आरोपींविरुद्ध पुरावे वापरले जाऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे सचिन वाझेला खटल्याला सामोरं जावं लागणार नाही.
यापूर्वी सचिन वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात ईडीला पत्र लिहून अशीच विनंती केली होती. मनी लॉंड्रिंग प्रकरणात आरोपींविरोधात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचे सचिन वाझेंनी या लेखी पत्रात म्हटले होते. आता याच प्रकरणात सचिन वाझेंनी कलम 306 अंतर्गत ऍड. रौनक नाईक यांच्यामार्फत माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे.



