बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला माफीचा साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न दुर्दैवी – कॉंग्रेस

मुंबई – अनिल देशमुख यांच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न सीबीआयकडून सुरू असून हा प्रकार दुर्दैवी आहे, अशी टीका कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आणि अँटिलिया स्फोटके प्रकरणात वाझे हा आरोपी आहे. या आरोपीला अशा प्रकरणात माफीचा साक्षीदार बनवणे योग्य आहे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या प्रकरणात सीबीआयची भूमिकाच संशयास्पद आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा शंभर कोटी रुपये वसुलीचा आदेश दिला होता, असा आरोप असला तरी सीबीआयला या प्रकरणात कोणताही पुरावा सापडलेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सीबीआयवर राजकीय दबाव असून अशा प्रकारच्या दबावातून देशातील कायदा व न्याय व्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.





