पुणे जिल्हा | मोडकळीस आलेल्या घरकुलांची कामे त्वरित करा

अवसरी, (वार्ताहर) – अवसरी बुद्रुक येथील पंतप्रधान आवास घरकुल योजनेअंतर्गत मंजूर असणाऱ्या परंतु निधीअभावी काम रखडलेल्या आणि मोडकळीस आलेल्या घरकुलांचे प्रामुख्याने कामे सुरू करावे, अशी मागणी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करणार असल्याचे सरपंच सारिका हिंगे पाटील यांनी सांगितले.
मागील आठवड्यात तालुक्याचे पूर्व भागात झालेल्या पावसामुळे पोंदेवाडी येथील सुलाबाई रणपिसे यांचे घर पडून रणपिसे यांना दुखापत झाल्याने त्यांना पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील गुणगे मळा येथील पार्वताबाई महादू गुणगे यांचे मोडकळीस आलेले घर पाहणी करण्यासाठी सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गुणगे, प्रशांत वाडेकर, ग्रामस्थ उपस्थित होते.
सात वर्षांपासून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पार्वताबाई महादू गुणगे यांचे घरकूल मंजूर आहे. परंतु सर्वसामान्य (खुल्या) घटकांसाठी शासनाकडे निधी मंजूर नाही, या कारणास्तव आजतागायत गुणगे यांना घरकुल मिळाले नाही. पार्वताबाई महादू गुणगे यांचे माती दगड बांधकाम असलेल्या घराची कौले तुटायला लागली आहेत. तर मातीच्या भिंतीना पावसाचे पाणी लागून भिंती कधी ही ढासळू शकतात, अशी परिस्थितीत निर्माण झाली आहे.
या संदर्भात प्रशासनाने तत्काळ सर्व्हे करून धोकादायक घर असणाऱ्या नागरिकांना लवकरात लवकर घर बांधून द्यावीत. यासाठी आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांना या बाबत निवेदन देणार आहे. विष्णू काका हिंगे पाटील यांच्या माध्यमातून या बाबत पाठपुरावा करणार असल्याचे उपसरपंच अनिल हिंगे यांनी सांगितले.
उपाय योजावेत…
आंबेगाव तालुक्यातील गावांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांची घरे मुसळधार पाऊस झाल्यास भिंतीमध्ये पाणी जिरून भिंती पडून मोठ्या अपघात घडण्याची शक्यता आहे.
ही शक्यता लक्षात घेता आंबेगाव तालुका प्रशासनाने आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या सर्वच घटकातील आणि ज्या नागरिकांची घरकुले मंजूर आहेत. पण ते धोकादायक घरात राहतात, अशा घरांची पाहणी करून तातडीने उपाय योजना कराव्यात. या कामी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





