Pune : दोन दिवसांत पालखी मार्ग दुरुस्त करा; अतिरिक्त आयुक्तांच्या विभाग प्रमुखांना सूचना

पुणे : शहरातील पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात राडारोडा, तुंबलेले चेंबर, झाडांच्या धोकादायक फांद्या, लोंबकाळणाऱ्या केबल तसेच रस्त्यांवर खड्डे असल्याचे पत्र पोलीस आयुक्तांनी विभागीय आयुक्तांना दिले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून तातडीने ही कामे सुरू करण्यात आली असून, पोलिसांच्या सूचनेनुसार ८० टक्क्यांपेक्षाही अधिक काम झालेले आहे. त्यामुळे उर्वरित कामे पुढील दोन दिवसांत पूर्ण करावीत, असे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.
याशिवाय, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही या ठिकाणांची पहाणी केली असून, पोलिसांसोबत समन्वय ठेवण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. शहरात पालखी सोहळा शहरात मुक्कामी येण्यासाठी अवघ्या आठवड्याचा कालावधी शिल्लक असतानाही पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात राडारोडा, तुंबलेले चेंबर, झाडांच्या धोकादायक फाद्यां आदी कामे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने ही कामे करून पालखी मार्गातील अडथळे दूर करावेत यासाठी शहर पोलिसांकडून विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
विश्रांतवाडीपासून ते हडपसरच्या पुढील कुंजीरवाडीपर्यंत असलेल्या तब्बल ६० हून अडथळ्यांच्या ठिकाणांची यादीच दिली होती. त्यात तब्बल ५० ठिकाणे पुणे महापालिकेच्या हद्दीतील होती. हे पत्र मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून तातडीने पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग, उद्यान विभाग, विद्युत विभागास सूचना देत ही कामे सुरू केली आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या २० जून रोजी पुण्यात मुक्कामी येत आहे. त्यामुळे त्यापूर्वीच महापालिकेकडून युद्धपातळीवर ही कामे केली जाणार असल्याचेही दिवटे यांनी स्पष्ट केले.





